अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : कारने प्रवासाचा बेत आखत असाल तर सावधान...तुमच्या असहाय्यतेचा फायदा कोणी घेणार नाही याची काळजी घ्या...मुलुंडच्या नवघर पोलिसांनी वाहनचालकांना लुटणाऱ्या एका कार स्पार्क गँगला बेड्या ठोकल्या आहेत.
प्रवासात वाहन चालवताना एखाद्या निर्जनस्थळी अशा प्रकारे हात दाखवून तुम्हाला कोणी थांबवत असेल तर थांबू नका...ती व्यक्ती तुम्हाला मदत करेलच असं नाही. इथे तुम्ही लुटले जाऊ शकता...अशाच काही भामट्यांना मुलुंडच्या नवघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हायवेवर किंवा निर्जनस्थळी ठरविक अंतर ठेऊन आपलं सावज टिपायचं. गाडीला हात दाखवून थांबण्याची विनंती करायची... थोड्याच अंतरावर आणखी एक व्यक्ती तुम्हाला बॉनेटमधून धूर येत असल्याचं सांगेल...एखादा बेसावध वाहनचालक खरंच थांबून गाडी चेक करेल... याचवेळी तुम्हाला थांबवणारा व्यक्ती मदत करायच्या बहाण्याने जवळ येईल... आणि गाडीच्या बोनेटमधील एखादी वायर हातचलाखीने काढून टाकेल... वर तुम्हाला हेही पटवून देईल की गाडी थांबवली नसती तर केवढा कठीण प्रसंग उद्भवला असता...
गॅरेज बंद असायच्या दिवशीच चोरटे हायवेवर संधी शोधत उभे राहायचे... गाडीचा एखादा पार्ट गेल्याचं सांगत तोच पार्ट दुप्पट किंमतीत विकायचे. एका दक्ष नागरिकाने तक्रार केल्यावर पोलिसांनी सापळा रचून मोहम्मद सुफीयान, सलीम कुरेशी, मुन्नालाल खान, छोटे लाला खान यांना ताब्यात घेतलंय. या सर्वांवर विविध पोलीस ठाण्यात दहा ते पंधरा गुन्हे दाखल आहेत. एका दक्ष नागरिकामुळे ही गँग गडाआड झाली. प्रवासादरम्यान अशा काही अपप्रवृत्ती तुम्हाला दिसल्या तर त्याची माहिती पोलिसांना द्या..