Omicron in Maharashtra : कोरोनाचा नवा व्हेरिएंट omicron ने राज्यात चिंता वाढवली आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आज ओमायक्रॉनचे (Omicron) आणखी 4 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 2 रुग्ण उस्मानाबाद, 1 रुग्ण मुंबई तर 1 रुग्ण बुलढाणा इथला आहे.
यामुळे राज्यात एकूण ३२ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत 13, पिंपरी-चिंचवडमध्ये 10, पुणे मनपा क्षेत्रात 2, उस्मानाबादमध्ये 2 तर कल्याण-डोंबिवली, नागपूर, लातूर, वसई विरारआणि बुलडाणामध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
आज ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या 4 रुग्णांचे नमुणे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आले होते. 4 रुग्णांपैकी 3 पुरुष आणि 1 स्त्री रुग्ण आहे. हे चारही रुग्ण 16 ते 67 या वयोगटातील आहेत. या चारही रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत.
उस्मानाबादमध्ये आढळलेला रुग्ण हा शारजा इथून आला होता. तर त्याच्या सहवासातील एकाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. बुलडाणा इथल्या रुग्णाने दुबई इथून तर मुंबईत आलेल्या व्यक्तीने आयर्लंड प्रवास केला आहे. चार रुग्णांपैकी 3 रुग्णांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे.
या चारही रुग्णांच्या सहवासात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, जानेवारी महिन्यामध्ये ओमायक्रोनचा संसर्ग राज्यात मोठ्या प्रमाणावर लोकांना झालेला आढळेल, असा इशारा आरोग्य विभागानं दिलाय. राज्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत सादरीकरण केलं. लसीचे दोन डोस सर्वांना देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.