मुंबई : मुंबईमधल्या आग्रीपाडा इथल्या एका अनाथ आश्रमातील तब्बल 22 मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं चिंता वाढली आहे. सेंट जोसेफ अनाथ आश्रमातील हा धक्कादायक प्रकार आहे. आश्रमात कोरोना रुग्ण आढळल्याने तपासणी शिबिर घेण्यात आलं होतं. यात तब्बल 22 मुलं कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं.
यात 12 वर्षांखालील 4 मुलांना मुंबईतल्या नायर रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे तर 12 वर्षावरील मुलांना रिचर्डसन अँड क्रूडस इथं कोरोना उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.
कांदिवली पश्चिम इथल्या वीणा गीत संगीत गंगोत्री यमुनोत्री बिल्डिंगमध्ये 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. एकाचवेळी 17 जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या बिल्डिंगला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
कांदिवलीत सापडलेले हे 17 पैकी 10 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आहे. तर अजूनही सात रूग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कांदिवली राहणाऱ्या नागरिकांच्या चिंतेत भर म्हणजे मुंबई महापालिकेला 5 डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत.