कांदिवलीत एकाच सोसायटीमध्ये 17 जणांना कोरोनाची लागण

मुंबई महापालिकेला 5 डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत.

Updated: Aug 26, 2021, 01:55 PM IST
कांदिवलीत एकाच सोसायटीमध्ये 17 जणांना कोरोनाची लागण title=

मुंबई : कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. दुसरी लाट ओसरत असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त करण्यात येतोय. अशा परिस्थितीत राज्यात कोरोनाचा नवा वेरिएंट डेल्टा प्लसचे देखील रूग्ण आढळून येतात. नुकंतच मुंबईच्या कांदिवलीतील एका सोसायटीमध्ये 1-2 नव्हे तर 17 कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. एकाच सोसायटीमध्ये 17 रूग्ण आढळल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

कांदिवली पश्चिम येथील वीणा गीत संगीत गंगोत्री यमुनोत्री बिल्डिंगमध्ये 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. एकाचवेळी 17 जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या बिल्डिंगला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 

कांदिवलीत सापडलेले हे 17 पैकी 10 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आहे. तर अजूनही सात रूग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कांदिवली राहणाऱ्या नागरिकांच्या चिंतेत भर म्हणजे मुंबई महापालिकेला 5 डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे डिसेंबर 2022पर्यंत सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत कोरोना टास्क फोर्सने माहिती दिली आहे. त्याचवेळी 5 सप्टेंबरआधी शिक्षकांचे लसीकरण करा, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात डेल्टा प्लसचा 24 जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील रुग्णांची संख्या 103वर पोहोचली आहे. त्यामुळे बारकाईनं लक्ष ठेवण्याचं तज्ज्ञांचं मत आहे.