औरंगाबाद : हुंड्याविरूद्ध कठोर कायदे आणि सामाजिक जागरूकता मोहीम असूनही, ही परंपरा आजही बर्याच ठिकाणी सुरू आहे. हुंड्यामुळे आत्महत्या किंवा हत्येचे प्रकरण देखील वाढत आहे. त्यात महाराष्ट्रातील औरंगाबाद येथून हुंड्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आले आहे. यात आधी मुलीकडच्यांनी सुरूवातीला हुंडा तर दिला परंतु त्यानंतर मुलाकडच्यांची वाढती आणि विचित्र मागणी ऐकून मुलीच्या कुटूंबियांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
एका मीडिया वृत्तानुसार, नाशिक येथे रहिवासी असलेल्या सैन्याच्या जवानाचे औरंगाबादमधील रामनगर भागात राहणाऱ्या एका मुलीशी यावर्षी फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाला होता. साखरपुड्यानंतर मुलगा आणि त्याच्या घरातल्यांनी हुंड्याची एक भलतीच मागणी केली.
कुटुंबातील सदस्यांनी हुंडामध्ये 21 नख असलेला कासव आणि लॅब्राडोर कुत्र्याची मागणी केली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी मुलगा आणि त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांविरूद्ध पोलिसात एफआयआर दाखल केली आहे.
वृत्तानुसार, मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, साखरपुड्या पूर्वी मुलीच्या वडिलांनी मुलाला 10 ग्रॅम सोन्याची अंगठी आणि 2 लाख रुपये रोख दिले गेले. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, मुलीच्या लग्नात कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांनी त्यांच्या स्थितीनुसार हुंडा देण्याचे निश्चित केले होते. परंतु या कुटुंबाची मागणी वाढू लागली आणि मग साखरपुड्यानंतर त्यांनी 21 नख असलेला कासव, लॅब्राडोर कुत्रा याची मागणी केली. त्याचबरोबर त्यांच्या मुलीला सरकारी नोकरी देण्यासाठी आणखी 10 लाख रुपयांची मागणी केली.
परंतु या डिमांड आपणू पूर्ण करु शकत नाही आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत, त्यावेळी हे लग्न तुटलं. त्यानंतर त्यामुलीच्या वडिलांनी मुलाकडच्यांकडे आपले पैसे परत मागितले. परंतु त्यांनी ते देण्यास नकार दिल्याने मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
पीडितांचे कुटुंबाने सांगितले की, त्यांना या प्रकरणात न्याय हवा आहे. जेणेकरुन कोणत्याही मुलीला पुन्हा अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. यासंदर्भात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.