शिर्डी: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यानिमित्ताने नगरच्या राजकारणातील एकमेकांचे हाडवैरी असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात पुन्हा एकदा सामना रंगला आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर विखे-पाटलांना आता चौथ्या-पाचव्या रांगेत बसावे लागतेय, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला. ते शुक्रवारी शिर्डी येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी करत राधाकृष्ण विखे-पाटील यांची अक्षरश: पिसे काढली.
मी ईडीला 'येडी' बनवून टाकीन- पवार
काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर मी प्रचारासाठी राज्यभरात फिरत आहे. मात्र, राधाकृष्ण विखे-पाटील मंत्री होऊन गावागावात फिरत आहेत. मलाही गावागावात फिरायला आवडले. पण मला वरची संधी मिळाली, असा टोला यावेळी बाळासाहेब थोरात यांनी विखेंना लगावला. तसेच काँग्रेसने विखे-पाटील परिवाराला भरभरून दिले. मात्र, दिवाळीनंतर शालिनीताई विखे-पाटील यांचे जिल्हाध्यक्षपद राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
'एक भाऊ गेला तर फरक पडत नाही, हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे'
माझे हेलिकॉप्टर जिल्ह्यातच तळ ठोकून असल्याचे विखे-पाटील सांगत फिरतात. पण माझ्याकडे एक जास्तीचे हेलिकॉप्टर आहे. तुमच्या काकडेच्या विमानतळाला विचारा माझे विमान कितीवेळा चढले आणि किती वेळा उतरले. शेवटी मी प्रदेशाचा अध्यक्ष आहे. मात्र, यांची अवस्था काय आहे? जे स्टेजवर बसत होते ते आता भाजपमध्ये गेल्यानंतर चौथ्या-पाचव्या रांगेत बसून मोबाईल पाहत बसतात, असा खोचक टोला बाळासाहेब थोरात यांनी हाणला.