मुंबई : ZP Election Result 2021 Update : राज्यात जिल्ह्या परिषद निवडणुकीत संमिश्र निकाल दिसून येत आहे. काही ठिकाणी काँग्रेस, भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. नागपूरमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता राखली आहे. अकोल्यात वंचितची जोरदार कामगिरी दिसून येत आहे. वाशिममध्ये महाविकास आघाडी धुळे, नंदूरबारमध्ये जोरदार लढत दिसून आली. धुळे जिल्हा परिषदेत भाजप आघाडीवर असून नंदूरबारमध्ये काँग्रेसची आघाडी दिसत आहे.
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात पुन्हा काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. तर अकोल्यात वंचित बहुजनने दुसऱ्या पक्षाला शिरकाव करु दिलेला नाही. अकोल्याचा गड वंचितने राखला आहे. तर वाशिममध्ये महविकास आघाडीचे पुन्हा वर्चस्व पाहायला मिळाले आहे. धुळे जिल्हा परिषदेत भाजप आघाडीवर असून सत्ता मिळविण्याची शक्यता आहे.
तर मुंबई जवळील पालघरमध्ये शिवसेना, भाजपला समान जागा मिळाल्या आहेत.
पालघर जिल्हापरिषदेच्या वनई गटात भाजपाचे पंकज कोरे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित यांना पराभवाची धूळ चारली आहे. याठिकाणी मोठी चुरस होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, भाजपने शिवसेनेला दे धक्का दिला आहे.
धुळे जिल्ह्यातील सर्वात धक्कादायक निकाल कापडणे आणि कुसूंबा येथुन समोर आला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कापडणे गटातून किरण पाटील जिंकून आले तर दुसरीकडे मात्र किरण शिंदे यांच्या पत्नी वैशाली शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. किरण पाटील यांनी 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणामुळे याचिका दाखल केली होती. अशा परिस्थितीत त्यांनी भाजपचे उमेदवार रामकृष्ण खलाणे यांचा पराभव केलेला आहे.
नागपूरमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. दोन महत्त्वाच्या जागा भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. नगरखेडा पंचायत समिती आणि पारडसिंग जिल्हा परिषद या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. आता दोन्ही जागा भाजपने आपल्याकडे खेचून आणल्या आहेत. विदर्भात काँग्रेसची मुसंडी दिसून येत आहे. अद्याप संपूर्ण निकाल हाती यायचा आहे.
नागपूरमधील नरखेड पंचायत समिती भाजपच्या ताब्यात गेली आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का बसला आहे. नागपूरमधल्या डोंगरगाव पंचायत समितीत काँग्रेसच्या उज्वला खडसे विजयी झाल्या झाल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या सुंदोपसुंदीमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत पीछेहाट झाली आहे. शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेसच्या असमान्वयामुळे हा फटका बसल्याचे आरोप केले आहे. तर दुसरीकडे पालघरमध्ये शिवसेनेला एका जागेवर मोठा फटका बसला आहे. शिवसेनेने 5 जागा जिंकल्या आहेत. यामध्ये एकूण 11 जागा महाविकास आघाडीने जिकल्या आहे. खासदार राजेंद्रकुमार गावित यांचा मुलाचा पराभव झाला आहे. गावित यांच्या जागेसाठी पुढे पुन्हा काम करणार, अशी प्रतिक्रिया ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.