Chhatrapati Sambhajinagar Riots: छत्रपती संभाजीनगर दंगलीबाबत 'झी 24 तास'ची भूमिका

Zee 24 Tass Stand On Chhatrapati Sambhajinagar Riots: शहरामधील किराडपुरा भागात दोन गटांमध्ये झालेल्या दंगलीनंतर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

Updated: Mar 30, 2023, 05:05 PM IST
Chhatrapati Sambhajinagar Riots: छत्रपती संभाजीनगर दंगलीबाबत 'झी 24 तास'ची भूमिका title=
Zee 24 Tass Stand on Chhatrapati Sambhajinagar Riots

Chhatrapati Sambhajinagar Riots: छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात दोन गटांत झालेल्या दंगलीनंतर आता येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. शहरामध्ये पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला असून संभाजीनगराला छावणीचं स्वरूप आलं आहे. दरम्यान राज्यातील शांतता आणि सलोखा कायम रहावा या उद्देशाने या दंगलीमधील व्हिडीओंचं प्रक्षेपण न करण्याचा निर्णय 'झी 24 तास'ने घेतला आहे. या दंगलीबाबतची 'झी 24 तास'ची भूमिका खालीलप्रमाणे....

'झी 24 तास'ची भूमिका

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीतील जाळपोळ आणि तोडफोडीचे सर्व व्हिडिओ 'झी 24 तास'कडे उपलब्ध आहेत. मात्र रामनवमी उत्सवाच्या दिवशी आणि रमझानचा महिना असल्यानं राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये. तसेच महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ्यही खराब होऊ नये यासाठी एक जबाबदार न्यूज चॅनल म्हणून सर्व व्हिडीओ सकाळपासून उपलब्ध असूनही या दंगलीचा एकही व्हिडीओ आम्ही दाखवलेला नाही आणि यापुढेही न दाखवण्याचा निर्णय आम्ही घेतलाय.

शहराला छावणीचं स्वरुप

किराडपुरा भागातील या दंगलप्रकरणामध्ये पोलिसांनी 600 जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या दंगलीचे सर्व व्हिडिओ 'झी २४ तास'कडे उपलब्ध आहेत. मात्र जबाबदार माध्यम म्हणून या जाळपोळीचे आणि तोडफोडीचे कुठलेही व्हिडिओ आम्ही न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांचं आवाहन

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणासंदर्भात बोलताना, "मी पोलीस आयुक्त, डीजींशी बोललो आहे. मी सकाळीच यासंदर्भात विचारणा केली आहे. आता पूर्णपणे स्थिती नियंत्रणात आहे पोलीस आपलं काम करत आहेत. सर्वांनी शांतता राखली पाहिजे रामनवमीचा उत्सव आहे. आपल्या राज्यामध्ये सर्व धर्मीय सर्व सण एकत्रित येऊन साजरा करतात. सर्व धर्मीयांना माझी आवाहन आणि विनंती आहे की शांतता राखावी. कायदा सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजे," अशी प्रतिक्रिया नोंदवली.

गृहमंत्री काय म्हणाले?

राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरमध्ये घडलेला प्रकार हा दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे. तसेच आता शहरामध्ये शांतता प्रस्थापित होत असल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे या प्रकरणाला राजकीय रंग देणं चुकीचं असल्याचंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. काही लोक चुकीची वक्तव्य करत आहेत. शांतता राखली पाहिजे ही सगळ्याच नेत्यांची जबाबदारी आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं.