सावधान, गुन्हेगारांच्या उदात्तीकरणाला भुलतेय तरुण पीढी!

पुस्तकं वाचून लोक शहाणे होतात असा आजवर समज होता. मात्र राज्याची क्राईम कॅपिटल होऊ घातलेल्या नाशिकमध्ये अजब प्रकार पाहायला मिळतोय. कुख्यात गुन्हेगारांवर आधारीत पुस्तकं वाचून इथले गुन्हेगार कारवाया पूर्ण करत असल्याचं पाहायला मिळतंय. 

Updated: Jul 4, 2017, 10:38 PM IST
सावधान, गुन्हेगारांच्या उदात्तीकरणाला भुलतेय तरुण पीढी! title=

मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : पुस्तकं वाचून लोक शहाणे होतात असा आजवर समज होता. मात्र राज्याची क्राईम कॅपिटल होऊ घातलेल्या नाशिकमध्ये अजब प्रकार पाहायला मिळतोय. कुख्यात गुन्हेगारांवर आधारीत पुस्तकं वाचून इथले गुन्हेगार कारवाया पूर्ण करत असल्याचं पाहायला मिळतंय. 

वाचाल तर वाचाल... पुस्तक वाचा, ज्ञान मिळवा... ग्रंथ आपले सोबती... अशी काही वाक्य शाळेत तुम्ही शिकला असाल. पण नाशिकमध्ये मात्र आता विपरीत घडतंय. मोठ्या अंडरवर्ल्ड डॉनच्या आयुष्यावरची पुस्तकं वाचून गुन्हेगार तयार होत आहेत. 

गेल्या आठवड्यात संदीप लाड या गुन्हेगारावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पोलिसांनी तात्काळ औरंगाबादमधून पाच ते सहा जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ दाऊद, छोटा राजन, इक्बाल कासकर अशा कुख्यात गुन्हेगारांवर आधारीत पुस्तकं आढळून आली. या पुस्तकात वर्णन केलेल्या विविध घडामोडींवरून हे गुंड प्रभावित झाले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी दिलीय.  

१९९२-९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांनंतर अंडरवर्ल्डवर आधारीत अनेक सिनेमे आले. गुन्हेगारी जगताचा मागोवा घेणाऱ्या मालिकाही टीव्हीवर आल्या. गुन्हेगारीच्या दलदलीत अडकत चाललेल्यांना या गोष्टींतून विकृत उत्तेजना मिळाल्याचं पाहायला मिळालं. पुस्तकांबाबतही तेच होताना दिसतंय, असं मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जयंत ढाके यांनी व्यक्त केलंय. 

एकेकाळी राष्ट्र पुरूषांची, थोर समाजसुधारकांची चरीत्र वाचून प्रभावित झालेले तरूण पहायला मिळायचे अजूनही असतात... पण गुन्हेगारी जगतावरची पुस्तकं वाचून गुन्हे करणारे तरूणही निर्माण होतायत ही बातमी पोलिसांसाठीच नाही तर समाज म्हणून आपल्यासाठीही धोक्याची घंटा वाजवणारी म्हटली पाहिजे.