महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी चक्क अहमदनगरमध्ये; 'या' पठ्ठ्याने केली कमाल

त्याने शेतात स्ट्रॉबेरीची दीड हजार रोपे लावली. तीन महिने या रोपांची योग्य काळजी घेतली.

Updated: Feb 16, 2020, 07:07 PM IST
महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी चक्क अहमदनगरमध्ये; 'या' पठ्ठ्याने केली कमाल title=

अहमदनगर: अलीकडे तरुणांचा शेतीकडे ओढा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, नव्या पिढीने शेतीमध्ये लक्ष घालून नवीन प्रयोग केल्यास काय घडू शकते, याचा प्रत्यय अहमदनगरमध्ये आला. अहमदनगरच्या भाळवणी गावातील राहुल गुंजाळ या तरुण शेतकऱ्याने चक्क स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे. परंतु, महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचे पीक नगरमध्ये कसे घेतले जाऊ शकते, असा प्रश्न अनेकांना पडला होता.

मात्र, राहुल गुंजाळ या तरुण शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची शेती कुठेही करता येऊ शकते हे दाखवून दिले आहे. दोन वर्षांपूर्वी स्ट्रॉबेरीची शेती करण्याची संकल्पना राहुलला सुचली. १५  ते ३५ अंशापर्यंतच्या तापमान स्ट्रॉबेरीसाठी  पोषक असते. नगर परिसरात हिवाळ्यात तापमानाचा पारा १२ ते २२ अंशापर्यंत खाली घसरतो. त्यामुळे आपण स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी करू शकतो याचा विश्वास राहुलला आला. त्याने शेतात स्ट्रॉबेरीची दीड हजार रोपे लावली. तीन महिने या रोपांची योग्य काळजी घेतली. यानंतर राहुलच्या शेतात स्ट्रॉबेरीचे चांगले पीक आले. 

स्ट्रॉबेरीचे पीक घेण्यासाठी राहुलला आठ ते दहा हजार रुपये खर्च आला आहे. गेल्या महिन्याभरापासून राहुलची स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी जात आहे. रोज आठ ते दहा किलो स्ट्रॉबेरीपासून त्याला एक हजार ते बाराशे रुपये मिळतात. त्यामुळे येत्या पाच महिन्यात राहुलला एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी खात्री आहे.

राहुलचा स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग पहायला इतर भागातील शेतकरी भाळवणी गावाला भेट देत आहेत. अनेकांना यापासून प्रेरणा घेतली असून आपणही स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणार असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे तरुणांनी शेतीत स्वारस्य दाखवुन मेहनत घेतली तर किती मोठे यश मिळू शकते, हे यानिमित्ताने सिद्ध झाले आहे.