Yeola Gudi Padwa : राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र, सरकारकडून केवळ आश्वासन देण्यात आले आहे. अद्याप शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. तसेच शेती पिकाला हमीभाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेती करुनही पिकाला भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नांगर तसेच ट्रॅक्टर फिरवला आहे. तर काहींनी शेतमाल फेकून दिल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. मराठी नववर्षानिमित्ताने शेतकऱ्याने अनोखी गुढी शेतातच उभारली. पिकाला हमीभाव मिळू दे, अशी या शेतकऱ्याने मागणी केली आहे.
मराठी नववर्षाचा गुढीपाडवा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असून येवला तालुक्यातील पारेगाव येथील वैभव खिल्लारे या तरुण शेतकऱ्याने आपल्या कांद्याच्या शेतात गुढीला कांद्याची माळ, द्राक्ष, मिरच्यांच्या माळा घालत अनोखे संदेश फलक लावत गुढी उभारली आहे. कांद्याला हमीभाव द्या, पावसाने पीक झाले उध्वस्त, शेतमालाला भाव द्या, असे अनोखे फलक गुढीला लावत या शेतकऱ्याने आपल्या शेतात गुढी उभारत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
तरुण शेतकरी वैभव खिल्लारे यांनी सांगितले की, अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. उभे पिक जमीनदोस्त झाले आहे. तर सरकारने कांदा निर्यातीवर निर्बंध लादल्याने कांद्याला भाव मिळत नाही. कांदा शेतकरी अडचणीत आला आहे, अशी माहिती कांदा उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर खिल्लारे यांनी दिली आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात वादळी वारे, पाऊस, गारपिटीमुळे नऊ तालुक्यापैकी 3 तालुक्यात सहा हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यातील पूर्णा, जिंतूर, गंगाखेड या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालंय. इतर तालुक्यातील नुकसानीची माहिती गोळा करणं सुरू असल्याचं जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितलंय. गहू,ज्वारी,संत्रा,भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यावरच नुकसानीचा एकूण आकडा हाती येईल, असे सांगितले जात आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा फार भाजपाला बसला नाही भाजपालाच्या दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला भाजीपाला गुजरात राज्यात विक्रीसाठी नेतात. या ठिकाणी दरही चांगला मिळतो. मात्र गेल्या आठवड्यामध्ये तब्बल सहा वेळा अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. काढणीला आलेला भाजीपाला उध्वस्त झाल्यामुळे दर वाढण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. टमाटे, कोबी, मिरची आणि वांगे यासोबत इतर पालेभाज्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भाजीपाला उत्पादन घटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.