यवतमाळ : प्रगतीशील महाराष्ट्राच्या गप्पा हाकणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही बातमी आहे. यवतमाळ जिल्ह्यात सध्या पुरानं थैमान घातलंय. पावसामुळे ग्रामीण भागातले रस्तेच बंद आहेत. मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय.
ही विदारक दृश्यं आहेत दारव्हा तालुक्यातल्या राजुरा गावाजवळून वाहणाऱ्या कुपटा नदीवरची. या नदीवर पूल आहे. मात्र थोडासाही पूर येताच तो पाण्याखाली जातो. अशावेळी इथल्या विद्यार्थ्यांना, नागरिकांना नदीवरच बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरुन धोकादायक प्रवास करावा लागतो.
बंधाऱ्याच्या गेटसाठी सोडलेली तब्बल 4 ते 5 फुटांची जागा ओलांडण्यासाठी जीव धोक्यात घालून लाकडी फळीवरुन प्रवास करावा लागतो. हातणी या गावात केवळ चौथीपर्यंतच शाळा असल्यानं मुलं दारव्हामधील शाळेत शिकतात. त्यामुळे पावसाळ्यात या मुलांना आणि नागरिकांना हे जीवघेणं जगणं रोजचंच आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींना याचं काहीही सोयरसुतक नाही.
पावसाळ्यात हातणीच्या शाळकरी मुलांसह नागरिकांसाठी हा जीवघेणा प्रवास नित्याचाच ठरला आहे. प्रशासनाने नागरिकांची ही समस्या निकाली काढावी अशी मागणी इथले ग्रामस्थ करत आहेत.