अकोला : गेल्या तीन दिवसांपासून अकोला येथे सुरू असलेल्या यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. त्यामुळे त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं आहे.
शेतक-यांच्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांना सर्व मागण्या मान्य असल्याचा यशवंत सिन्हा यांनी दावा केलाय. त्यामुळे तीन दिवसापासून सुरु असलेलं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या असल्या तरी त्या पूर्ण होईपर्यंत दीर्घकालीन लढा सुरूच राहणार असेही यशवंत सिन्हा म्हणाले.
सर्व मागण्या पुर्णपणे मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला होता. अकोल्यात शेतकरी आंदोलन सुरू होतं. यशवंत सिन्हांसह आंदोलकांनी कालची संपूर्ण रात्र अकोला पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरच काढली. यशवंत सिन्हा यांनी सरकारकडे एकूण सात मागण्या केल्या. त्यापैंकी सहा मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या होत्या.
नाफेडने शेतमाल किमान आधारभूत मूल्यानं खरेदी करण्यासंदर्भात ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर आंदोलक ठाम होते.
यशवंत सिन्हांच्या आंदोलनाला विविध पक्षांच्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला. माजी मंत्री आणि तृणमूलचे नेते दिनेश त्रिपाठी, शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, आपच्या नेत्या प्रीती मेनन हे सिन्हांना पाठिंबा देण्यासाठी अकोल्यात आले होते.