विशाल करोळे, औरंगाबाद: गंगापुरच्या शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका २० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तनुश्री तुपे असे या मृत महिलेचे नाव आहे. प्रसुतीदरम्यान शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांकडून कापसाचा बोळा तनुश्रीच्या पोटातच राहिला. यानंतर तनुश्रीची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तनुश्रीचे अवघे दहा दिवसांचे बाळ पोरके झाले आहे.
तनुश्री तुपे २२ जुलै रोजी प्रसुतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. २३ जुलै रोजी सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यानंतर तनुश्रीने बाळाला जन्म दिला. यानंतर तिला रुग्णालयातून घरीही सोडण्यात आले. मात्र, दोन दिवसानंतर तिला उलट्या, मळमळ यासह असह्य वेदना सुरु झाल्या.
त्यामुळे तनुश्रीला पुन्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी करून तनुश्रीला घाटी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. याठिकाणी उपचारादरम्यान २७ जुलै रोजी तनुश्रीचा मृत्यू झाला.
यानंतर शवविच्छेदन अहवालात तनुश्रीच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट झाले. सिझेरियन शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टर तनुश्रीच्या पोटातून कापसाचा बोळा काढायला विसरले होते. त्यामुळेच तिचा जीव गेला, असा आरोप तनुश्रीच्या नातेवाईकांनी केला आहे.
यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर जिल्हा आरोग्य विभागाने दोषी डॉक्टर रवींद्र ठवाळ यांना निलंबित केले. मात्र, तनुश्रीच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.