Thane News Today: ठाण्यातील कळव्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन बहिणींनी मिळून एका महिलेला मारहाण केली आहे. या मारहाणीत तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पाणीपुरी खाताना महिला त्यांच्याकडे बघून हसत असल्याच्या संशयातून दोघींमध्ये वाद झाले आणि त्यातूनच हत्येचा थरार घडला आहे. कळवा पोलिसांनी आरोपी रेणुका बोंद्र, अंजना रायपुरे आणि लक्ष्मी गाडगे यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. मयत महिलेचे नाव मुक्ता कलशे असून आरोपी महिला तिची वहिनी होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ता तिची आई आणि भाऊ सचिनसोबत कळव्यातील जय भीम नगरमध्ये राहत होती. तर आरोपी रेणुकाचे लग्न मुक्ताचा भाऊ राहुलसोबत झाला होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर रेणुकाने त्याच परिसरात राहणाऱ्या दुसऱ्या युवकासोबत लग्न केले. तेव्हापासून रेणुकाचा मुक्ताच्या कुटुंबीयांशी संपर्क तुटला.
घटना घडली त्या दिवशी, मुक्ताची लग्न झालेली एक बहिणी दिवाळीच्या दिवशी माहेरी आली होती. 23 नोव्हेंबर रोजी मुक्ता तिच्या बहिणीसोबत पाणीपुरी खाण्यासाठी गेली होती. त्यावेळी दोघी बहिणी एकमेकींसोबत बोलत होत्या व हसत होत्या. त्याचवेळी रेणुकादेखील त्यांच्या बाजूने गेली. मात्र, मुक्ताला आणि तिच्या बहिणीला हसताना बघून त्या आपल्यालाच हसत आहेत असा समज तिचा झाला. त्यानंतर दोघींमध्ये वाद झाले. मुक्ताने रेणुकाला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने काहीच ऐकून घेतलं नाही आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
दुसऱ्यादिवशी सकाळी मुक्ता पब्लिक टॉयलेटमध्ये जाताना त्याचवेळी रेणुका अंजना आणि लक्ष्मी या तिघी बहिणींनी तिची वाट अडवली. तिघींनी मुक्ताला लाथा-बुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. याबाबत मुक्ताच्या आईला कळताच ती धावतच मुलीला वाचवण्यासाठी आली. तसंच तिघींना मुलीला न मारण्याची विनंती केली. मात्र, त्या तिघींनी तिच्या आईलाही मारहारण केली. लक्ष्मीने मुक्ताचे केस पकडून तिला जमिनीवर फेकले.
गंभीर जखमी झालेल्या मुक्ताने पोलिसांसोबत संपर्क करत कळवा पोलीस ठाण्यात मारहारण केल्याची तक्रार दाखल केली. जखमी मुक्ताला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जिथे तिच्यावर उपचार सुरू होते तिथेच तिचा मृत्यू झाला. नंतर पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा हत्येत वर्ग केला आहे. पोलिसांनी तिघी बहिणींना अटक केली आहे.