पुणे : राज्यातील ठाकरे आणि पवारांचं सरकार हे बदमाश सरकार आहे. ते हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई करणार नाही. त्यांच्यावर कारवाई केली तर आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर कारवाई करावी लागणार, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या कंपनी मंत्रालयाने मुश्रीफ यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगावं या घोटाळेबाजांकडे भरष्टाचाराचा पैसा कुठून आला. हसन मुश्रीफ यांच्या 100 कोटी रुपायांहून अधिक बेनामी मालमत्तांची यादी आयकर विभागाला दिली आहे. ती मालमत्ता जप्त करण्यात यावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
सोमय्या यांनी पुण्यात आज आयकर अधिकाऱ्यांची भेट घेतली. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 158 कोटींच्या मनी लॉन्ड्रींग घोटाळ्याचा आरोप केला आहे त्यासंदर्भात काय कारवाई केली याचं स्पष्टीकरण मागण्यासाठी किरीट सोमय्या पुण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
किरीट सोमय्या यांचा आरोप
हसन मुश्रीफ यांच्या शंभर कोटीहून अधिक बेनामी प्रॉपर्टीची यादी आम्ही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. मुश्रीफ यांनी 47 कंपन्यांमधून मनी लॉन्ड्रींग केलं, ही सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
भ्रष्टाचाराचा हा पैसा कोणत्या कंत्राटदारांकडून आला, त्याची चौकशी करण्याची जबाबदारी ठाकरे-पवार सरकारची आहे. पण ते करणार नाहीत, कारण ते दोन्ही परिवार घोटाळेबाज आहेत, त्यांच्यावर कारवाई करायला गेले तर आदित्य ठाकरेंवर कारवाई करावी लागणार, अजित पवारांवर कारवाई करावी लागणार. त्यामुळे स्वाभाविक आहे की एक घोटाळेबाज दुसऱ्या घोटाळेबाजाला वाचवणार. पण अंतिम कारवाई करेपर्यंत पाठपुरावा करणार असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.