मुंबई : 10वी, 12 वीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केलीय. दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे. असं असलं तरी कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता ऑफलाईनचा अट्टाहास कशासाठी असा सवाल पालकवर्गातून उपस्थित होतोय.
10वी 12वीच्या परीक्षेबाबत अखेर शिक्षणमंत्रालयानं मोठा निर्णय घेतला आहे. या परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांच्या शाळेतच परीक्षा घेतल्या जातील. याआधी 10वी,12वीच्या परीक्षा ऑनलाईन होणार असं सांगण्यात येत होतं.
त्यातच गेल्या काही दिवसात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे सरकार संभ्रमात होतं. मात्र अखेर सरकारनं ऑफलाईन परीक्षांची घोषणा करून विद्यार्थ्यांसह पालकांनाही धक्का दिला आहे.
पालकवर्गानं मात्र सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. उलट परिस्थिती आणखीन गंभीर बनत चालली आहे. मग ऑफलाईन परीक्षेचा आग्रह कशासाठी असा सवाल पालकांमधून उपस्थित होत आहे.
................................
सध्याच्या स्थितीत कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येते की काय ? अशी परिस्थीती आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारी कार्यालयांमधील कर्मचारी संख्या 50 टक्क्यांवर आणण्यात आलीय.
अशावेळी ऑनलाईन परीक्षेचा मार्गही असताना ऑफलाईनसाठी सरकारची घाई कशासाठी? हा सवाल उपस्थित होणं स्वाभाविक आहे.