कराड : साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहतील, असं बोललं जात होतं. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव होतं. पण मोदी या कार्यक्रमाला आले नाहीत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या गैरहजेरीचं कारण सांगितलं आहे. पंतप्रधान हे एका घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे प्रोटोकॉल (शिष्टाचार) नुसार ते पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला जाऊ शकत नाहीत. पण नरेंद्र मोदींनी उदयनराजेंचं स्वागत केलं आहे आणि ते १९ तारखेला उदयनराजेंची भेट घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराडमध्ये आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उदयनराजे भोसलेही उपस्थित होते. सातारा जिल्हा संपुष्टात आणण्याचा डाव होता. एक बारामती आणि दुसरा कराड असे जिल्हे बनवण्याचा डाव मी हाणून पाडला, असा निशाणा उदयनराजे भोसलेंनी पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यावर साधला. शरद पवार यांचा काल, आज आणि उद्याही आदर करेन, असंही उदयनराजेंनी सांगितलं.