पालघर, अकोला, वाशिम, नंदुरबारमध्ये कोण सत्ता स्थापन करणार?

महाविकासआघाडीचं पारडं जड....

Updated: Jan 9, 2020, 06:42 PM IST
पालघर, अकोला, वाशिम, नंदुरबारमध्ये कोण सत्ता स्थापन करणार? title=

मुंबई : नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीला, तर धुळ्यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र बाकीच्या चार जिल्हा परिषदांमध्ये अजूनही सत्तेचं गणित स्पष्ट झालेलं नाही.

पालघर 

पालघर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करतील, अशी चिन्हं आहेत. पालघरमध्ये शिवसेनेला १८ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १४ जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास बहुमत आकडा सहज पार करू शकतात. शिवसेनेचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात आघाडी संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

अकोला

अकोला जिल्हा परिषदेत बहुमतासाठी भारिप बहुजन महासंघाला काही जागा कमी पडत आहेत. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीनं भारिप पुन्हा सत्ता स्थापन करेल, अशी चिन्हं आहेत.

वाशिम

वाशिम जिल्हा परिषदेतही त्रिशंकू निकाल लागला आहे. याठिकाणी सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. १२ जागा मिळून राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र बहुमतासाठी २७ चा आकडा गाठण्यासाठी राष्ट्रवादीला शिवसेना आणि काँग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे.

नंदुरबार 

नंदुरबार जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि भाजपला समसमान जागा मिळाल्या आहेत. मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्यात त्यादृष्टीनं बैठक होणार असल्याचं समजतं आहे.

याचाच अर्थ ६ पैकी केवळ धुळे जिल्ह परिषदेत भाजप सत्तेवर येणार आहे. तर अकोल्यात भारिप, तर इतर ४ ठिकाणी सत्तेसाठी महाविकास आघाडीचा प्रयोग रंगणार आहे.