'मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलंय ते उद्धव ठाकरेंनी सांगावं, म्हणजे वाद होणार नाही'

 मुख्यमंत्रीपदावरून भाजपा-शिवसेनेमध्ये सध्या वादाची ठिणगी पडत आहे.

Updated: Jun 24, 2019, 03:01 PM IST
'मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलंय ते उद्धव ठाकरेंनी सांगावं, म्हणजे वाद होणार नाही' title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : युतीचं काय ठरलंय ते उद्धव ठाकरेंनी सांगावं म्हणजे मुख्यमंत्री कुणाचा ? यावरून वादविवाद होणार नाही, असा उपरोधीक सल्ला भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे. विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आभाराचा ठराव विधानसभेत मांडला. त्या ठरावावर बोलताना खडसेंनी आपल्या पक्षातील नेत्यांसह राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही टोले लगावले. मुख्यमंत्रीपदावरून भाजपा-शिवसेनेमध्ये सध्या वादाची ठिणगी पडत आहे. त्यापार्श्वभूमीवर खडसे यांनी हे वक्तव्य केलं.

विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कामाचा ठसा उमटवला पण अचानक त्यांनी राजीनामा का दिला ? आणि सत्तेत का आले ? ते कळलं नाही. आई म्हणते "बाळा गाऊ कशी अंगाई, तुझ्यामुळे झाले उत्तराई", तसं आता वड्डेटीवारांना विखेंना म्हणावं लागेल "तुझा होऊ कसा उत्तराई" अशा मिश्किल शैलीत खडसे यांनी वड्डेटीवारांचे अभिनंदन केलं.

खडसे वारंवार आपल्याच सरकारवर टीका करत असतात, त्याबाबत बोलताना ते म्हणाले, मी सत्ताधारी पक्षात आहे हे कधी कधी मी विसरून जातो, विरोधी पक्षनेत्याचे गुण अजून माझ्यातून गेलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांना कधी कधी वाटत असेल की मी विरोधी पक्षात जातो की काय, पण मी विखे पाटलांचा आदर्श ठेवणार नाही, मी करायचं असतं तर आधीच पक्षांतर केलं असतं आता पक्षांतर करणार नाही, असं सांगत त्यांनी विखेंना टोला खडसेंनी लगावला.

गिरीश आत्ता आला आधी तो निर्णयाच्या प्रकियेत नव्हता. तो जवळ झाला, विखेंना मंत्रीपद मिळालं आणि मुनगंटीवार दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेले, असं सांगत त्यांनी गिरीश महाजन आणि मुनगुटींवारांनाही चिमटा काढला. 

सरकार विरोधात वातावरण निर्मिती करुन आपलं सरकार आलं पाहिजे ही विरोधी पक्ष नेत्याची भूमिका, भाजपचं सरकार येण्यात (आधीच्या) विरोधी पक्ष नेत्याची महत्त्वाची भूमिका महत्त्वाची होती, असं सांगत स्वतःवर झालेल्या अन्यायबाबत अप्रत्यक्षपणे खडसेंनी भाषणात नाराजीही व्यक्त केली. मात्र आता आमचं आणि मुख्यमंत्र्यांचं ठरलं आहे. आमच्यात नेमकं काय ठरलंय ते मला आणि मुख्यमंत्र्यांनाच माहित आहे. मी उद्धवजींना तेच म्हणतो काय ठरलं ते सांगा, मुख्यमंत्री कुणाचा हा वादविवाद त्यामुळे होणार नाही, असा उपरोधक सल्ला खडसेंनी थेट उद्धव ठाकरेंना दिला.