Maharashtra Weather Updates : संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असून पिकांना धोका निर्माण होणार आहे. दरम्यान, काल कोकणात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला. रत्नागिरीतील साखरपा परिसरात जोरदार पाऊस झाला आणि दाणादाण उडवून दिली. वादळाने काही घरांवरील पत्रेही उडाले. तर सिंधुदुर्गात जोरदार पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.
राज्यातल्या अनेक भागात पावसाळी स्थिती आहे. दरम्यान, मुंबईत मात्र उष्मा वाढला, पुढील दोन दिवसांत आणखी तीव्र झळा सोसाव्या लागणार आहेत. तर वाशिम जिल्ह्यातील म्हसनी परिसरातील कडूलिंबाच्या झाडावर वीज कोसळून 5 माकडांचा मृत्यू झाला तर 4 ते 5 माकडं जखमी झाली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस पाऊस पडेल, असा इशारा मुंबई वेधशाळेनं दिला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज आहे. दरम्यान, विदर्भ आणि कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसला. बुलढाणा, वर्ध्यात गारपीटीसह पाऊस पडला. तर नागपूर, अमरावती, भंडा-यातही पावसानं तुफान बॅटिंग केली. या अवकाळी पावसामुळे पिकं धोक्यात आलीत, तर कोकणातील आंब्याचं नुकसान झाले आहे.
नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आखतवाडे परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळे कांद्यासह शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं. सटाण्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी शेताच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना सरकारी मदत मिळवून देण्याचं आश्वासन यावेळी बोरसे यांनी दिलं. जळगाव शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वा-यासह अवकाळी पाऊस बरसला. यामुळे शेतक-यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्याचबरोबर अनेक भागांतील वीज पुरवठाही खंडित झालेला पाहायला मिळाला.
सातारा शहरासह ग्रामीण भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसाने शहरासह, ग्रामीण भागातील जनतेची चांगलीच तारांबळ उडाली. सातारा जिल्ह्यात हवामान विभागाने पुढले 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुण्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. अचानक पावसाने हजेरी लावल्याने शेतक-यांची धावपळ उडाली. उकाड्यापासुन हैराण झालेल्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पावसानं दाणादण उडवली. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरात सोसाट्याचा वारा सुटल्यानं, अनेक ठिकाणचे पत्रे उडाले. तसंच वा-यामुळे अनेक ठिकाणी आंब्याची गळ झाली. यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.
नागपुरात अवकाळी पाऊस बरसला. दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वा-यासह जोरदार पाऊस शहारासह ग्रामीण भागातही बरसला. नागपूर हवामान विभागानं आजही पावसाचा अंदाज वर्तवलाय. वर्ध्यातील कारंजा, आष्टी भागात वादळी वा-यासह विजांच्या कडकडाटात जोरदार अवकाळी पाऊस बरसला. यात काही भागांत गारपीटही झाली... यामुळे शेतक-यांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात उद्याही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे... त्यामुळे शेतक-यांनी पिकाची काळजी घेण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय.
अमरावती जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला. विजांच्या कडकडाटासह बरसलेल्या वादळी पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. मार्च महिन्यात अमरावती जिल्ह्यात 4 हजार हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान झालं होतं. तर आत्ताच्या पावसामुळे अमरावती, वाशिम तसंच बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलेत. बुलडाणा जिल्ह्यात गारपीटीसह जोरदार पाऊस झाला. ब-याच भागांत जोरदार गारा बरसल्या. जिल्ह्यातल्या मोताळा आणि खामगावमध्ये जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे.
हवामान खात्याने दिलेल्या संकेतानूसार भंडा-यात विजांचा कडकडाट आणि वादळी वा-यासह पावसानं तुफान हजेरी लावली. तासभर झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं. या अवकाळी पावसानं घरं-गोठयांचे नुकसान झालं असून, धान पिकांचंही नुकसान झालंय. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे भाजीपाला सह कड़धान्य पीक धोक्यात आलं आहे. त्याचबरोबर उन पावसाच्या खेळाने साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे शेतक-यांचं मोठं नुकसान झालं आहे.
हवामान खात्याने दिलेल्या इशा-याप्रमाणे अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे कांदा आणि संत्रा, लिंबू पिकाला फटका बसण्याची चिन्हं आहेत.. सध्या अकोल्याचं तापमान 40 अंशांपर्यंत पोहचलंय. मात्र या पावसामुळे गारवा निर्माण झाला. वाशिमच्या कारंजा शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली.. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं.. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली... या अवकाळी पावसाचा काढणीला आलेल्या गहू, ज्वारी , उन्हाळी मूग, कांदा बीज याला मोठा फटका बसलाय.