अवकाळी पावसाने पुन्हा एकदा विदर्भाला झोडपले; अमरावतीसह भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणात गारपीट

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा विदर्भाला झोडपून काढले आहे. अमरावती, भंडारा, यवतमाळ, वर्ध्यात हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला आहे. हवामान विभागाने शनिवारीही पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय

Updated: Apr 7, 2023, 06:35 PM IST
अवकाळी पावसाने पुन्हा एकदा विदर्भाला झोडपले; अमरावतीसह भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणात गारपीट title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : शुक्रवारी अमरावती (Amravati News) जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) तडाखा बसला असून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी परत एकदा संकटात सापडला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला होता. आता तो इशारा अत्यंत खरा ठरला आणि दुपारी दोन नंतर अमरावती शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.

विजेच्या कडकडासह वादळी पावसाने नागरिकांची मात्र तारांबळ उडाली होती. तर ढग दाटून आल्याने काही प्रमाणात भर दुपारी काळोख झाला होता. त्यामुळे भर दुपारीसुद्धा दुचाकी व चारचाकी चालकांना हेडलाईट लावून रस्त्याने प्रवास करावा लागत होता. दरम्यान, मार्च महिन्यात सुद्धा अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यात अमरावती जिल्ह्यात 4 हजार हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झालं होतं. तर शुक्रवारी झालेल्या पावसामुळे अमरावती, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. दुसरीकडे शनिवारीसुद्धा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

भंडाऱ्यातही पावसाची तुफान हजेरी

हवामान खात्याने दिलेल्या संकेतानुसार भंडाऱ्यातही विजेच्या कडकडासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाने तुफान हजेरी लावली आहे. तासभर आलेल्या पावसाने भंडाऱ्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान वादळी वाऱ्याने घर-गोठयाचे नुकसान झाले असून पावसाने धान पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

वर्ध्यात अवकाळी पावसासह गारपीट

दुसरीकडे वर्ध्यातील कारंजा ,आष्टी परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होताच वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाचा हजेरी लावली. यात काही भागात गारपीट झाली आहे. जिल्ह्यात आज आणि उद्या दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

यवतमाळमध्ये वीज कोसळून बैलजोडी ठार

यवतमाळच्या महागांव तालुक्यातील थार बुद्रक येथील शेत शिवारात वीज कोसळल्याने बैलजोडी ठार झाली आहे. शेतात झाडाखाली ही बैल जोडी बांधलेली असताना अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यातच वीज पडून दोन्ही बैल जागीच ठार झाले.  रेणुकादास शिंदे या शेतकऱ्याची ही बैल जोडी होती.