Maharashtra Weather Update: मार्च महिन्यातच तापमानाचा पारा चढला आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाची काहिली जाणवू लागली आहे. महाराष्ट्रातील काही भागांत तर पारा 40 अंशावर पोहोचला आहे. मार्च महिन्यातच तापमान वाढल्याने एप्रिल-मेमध्ये काय होईल या विचारानेच नागरिकांना घाम फुटला आहे. राज्यातील तीन राज्यांमध्ये उष्माघाताची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं आरोग्य विभागाकडून उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तसंच, नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकच्या मालेगावमध्ये शनिवारी तापमानाने चाळीशी पार केली होती. मालेगावमध्ये 40.6 अंश इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. वाढत्या तापमानामुळं अनेक जण दुपारी घराबाहेर जाणेही टाळत आहेत. तर, नाशिक शहराचे तापमान 36.9 अंश तर किमान तापमान 8.6 अंश नोंदवले गेले आहे. मात्र, जिल्ह्यातील मालेगावमध्ये मात्र आत्तापासूनच तापमानाने चाळीशी ओलांडली आहे.
मार्च महिन्यातच राज्यातील अनेक जिल्ह्यात जिल्ह्यात तापमान ३३ ते ३५ अंशांवर पोहचल्याने उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. यातच यंदा दुष्काळाचे सावट असल्याने प्रामुख्याने मालेगाव, येवला व नांदगाव या तालुक्यांमध्ये उष्माघाताची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उन्हाचा पार वाढत असल्याने उष्माघात होऊ नये यासाठी आरोग्य विभाग सरसावला असून जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित केले आहे. नागरिकांनी उन्हात जाण्याचे टाळा, उष्माघाताचे काही लक्षणे दिसत असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
सध्या उष्णता खूप वाढली आहे. उष्माघाताचे रुग्ण आढळल्यास रुग्णालय सज्ज आहे. सध्या तरी उष्माघाताचे कोणतेही रुग्ण आढळले नाहीयेत, असं नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉ.ख्याती तुसे यांनी म्हटलं आहे.
उन खूप वाढल्यानंतर डोकं दुखणे, चक्कर येणे, उलट्या होणे, अस्वस्छ वाटणे, निराश वाटणे ही सर्व उष्माघाताची लक्षणे आहेत. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आत्तापासूनच सतर्क राहण्याची गरज आहे.
सर्वात पहिले 12 ते 3 या दरम्यान उन्हाची तीव्रता जास्त असते. त्यामुळं या काळात घराबाहेर पडणे टाळावे. जर घराबाहेर पडायचे असेलच तर छत्री किंवा टोपी घालूनच घराबाहेर पडावे. तसंच, सनस्क्रीन अगदी न विसरता लावा. पाणी भरपूर प्या तसंच, कलिंगड, नारळपाणी असे नैसर्गिक शितपिय प्या. सौम्य रंगाचे व कॉटनचे कपडे वापरा. यामुळं उन खूप कमी लागते. वृद्ध व लहान मुलांना यावेळी बाहेर पाठवू नका.
उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास पाणी भरपूर प्या. गरमीच्या वातावरणातून थोडं दूर जा. एका ठिकाणी शांत बसून राहा किंवा झोपून राहा. किंवा अगदीच जास्त त्रास जाणवत असेल तर लगेचच रुग्णालय गाठा, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.