Maharashtra Weather Update : सकाळच्या वेळी राज्यामध्ये काहीशी वाढ होत असतानाच आता पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तापमानात पुढचे काही दिवस बदल अपेक्षित आहेत. अनेक जिल्ह्यांतील किमान तापमानात घट होणार आहे. त्यामुळे राज्याला पुन्हा हुडहुडी भरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम उत्तर विदर्भ आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही भागात जाणवणार आहे.
परिणामी पुढील आठवड्याची सुरुवातही थंडीनं होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यातील थंडी पुन्हा वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील अनेक भागात तापमान 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमीच असेल. आतापर्यंत सातारा 14.4 °C, औरंगाबाद 10.2 °C, नांदेड 15.2 °C, नाशिक 12.5 मराठवाडा 15.2 °C, उदगीर 15.8 °C, जळगाव 10 °C, परभणी 13.6 °C, बारामती 12.6 °C आणि उस्मानाबादमध्ये 14.6 °C इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
पश्चिमी झंझावात सक्रीय असल्यामुळं आसाम आणि सिक्कीम या भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, अरुणाचल प्रदेशातील पर्वतीय भागांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीचा तडाखा बसू शकतो. याशिवाय पश्चिम आणि मध्य भारतात किमान आणि कमाल तापमानात वाढ होणार आहे. ज्यानंतर मात्र तापमानात 2-3 अंशांची घट नोंदवण्यात येईल.
देशाच्या किनारपट्टी भागामध्ये ढगाळ वातावरण असेल, तर उत्तर भारतामध्ये धुक्याची चादर कायम असेल. काश्मीरच्या खोऱ्यातही हिमवृष्टीपासून दिलासा मिळणार नाही असं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.