Monsoon Updates : यंदाच्या वर्षी हवामानात होणाऱ्या बदलांनी खुद्द हवामानशास्त्र विभागही हैराण झाला आहे. सुरुवातीला पडलेला उन्हाळा आणि त्यानंतर सुरु झालेला अवकाळी पाऊस हे संपूर्ण वातावरण दूर सरून आता सर्वांना प्रतीक्षा लागली होती ती म्हणजे मान्सूनची. हा मान्सूनही यंदाच्या वर्षी चकवा देतानाच दिसला. कारण ठरलेल्या मुहूर्ताहूनही उशिरानं तो केरळात पोहोचला. तिथूनच तो तळकोकणात आला. पण, महाराष्ट्राची वेस ओलांडून पुढे आलेला मान्सून तिथंच घुटमळला. (Maharashtra weather news )
काही दिवसांपूर्वीच आलेल्या बिपरजॉय या चक्रिवादळानं चिंता वाढवली आणि शेतकऱ्यापुढे एक नवं संकट उभं राहिलं. आता हवामान विभागानं वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार मान्सून 24 जून रोजी पुण्यात प्रवेश करेल. 25 जूनला पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल. तर, 26 जूनपासून पुण्यात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामानखात्यानं वर्तवला आहे.
उष्णतेची लाट किंवा तत्सम परिस्थितीचा नागरिकांना किमान पुढचे तीन दिवस सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भासह तिथं छत्तीसगढ, झारखंड, ओडिशा, तेलंगणा या देशातील काही भागांमध्येही उष्णतेचं प्रमाण वाढलेलं असेल.
देशातील पर्जन्यमानाविषयी सांगावं तर, राजस्थानच्या काही भागांमध्ये 19- 20 जून रोजी सोसाट्याचे वारे आणि मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. तर, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळू शकते. तुरळक ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची हजेरी गुजरातच्याही काही भागांमध्ये पाहायला मिळू शकते.
देशात ऐन मान्सूनच्या दिवसांमध्ये येणारी उष्णतेची लाट पाहता हवामान विभागानं यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करत नागरिक आणि यंत्रणांना सतर्क केलं आहे. तर, तिथं दक्षिण भारतामध्ये पुढचे पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह वीजांच्या कडकडाटात पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळेल. तामिळनाडू, केरळ आणि रायलसीमा या भागांमध्ये पावसामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तिथं देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या (Himachal Pradesh, Jammu Kashmir, Uttarakhand) हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर या भागांमध्ये काही ठिकाणी पावसाची हजेरी असेल तर, पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टीचाही तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं या राज्यांमध्ये स्थानिकांसोबतच पर्यटनासाठी जाणाऱ्यांनी ही बाब लक्षातच घेतच पुढील बेत आणखण्याचं आवाहन करण्यात येत आहे.