मुसळधार पावसाच्या शक्यतेने नागपूरमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

पावसाने अनेक मंत्र्यांच्या नागपुरमधील घरात पाणी शिरले. तर, थेट विधिमंडळातच पाणी साचले. त्यामुळे आमदार पाण्यात उभे असल्याचे चित्र महाराष्ट्राला दिसले. 

Updated: Jul 7, 2018, 08:58 AM IST
मुसळधार पावसाच्या शक्यतेने नागपूरमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी title=

नागपूर: मुसळधार पावसाची संततधार कायम राहिल्याने राज्याची उपराजधानी नागपूर जलमय झाली आहे. काल (शुक्रवार, ७ जुलै) दिसभर सुरू असलेली संततधार आज आणि उद्याही  (शनिवार, रविवार) कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नागपूरमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पावसाने दाखवला इंगा

राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. त्यामुळे राज्याचे सरकार आणि प्रशासन नागपूरमध्ये तळ ठोकूण आहेत. अशा स्थितीत पावसाने आपला इंगा दाखवला आणि नागपूर जलमय झाले. सलगपणे पडत असलेल्या पावसामुळे नागपूरच्या सकल भागात पाणी साचले. त्याचा परिणाम शहरातील वाहतुकीतवर झाला. शहरातील वीजपुरवठादेखील मोठ्या प्रमाणावर खंडीत झाला. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले. दरम्यान, येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने नागरिकांनीही सावधानता बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

विधिमंडळ अंधारात, आमदार पाण्यात

दरम्यान, या पावसाचा अधिवेशनालाही फटका बसला. पावसाने अनेक मंत्र्यांच्या नागपुरमधील घरात पाणी शिरले. तर, थेट विधिमंडळातच पाणी साचले. त्यामुळे आमदार पाण्यात उभे असल्याचे चित्र महाराष्ट्राला दिसले. त्यामुळे विधिमंडळाचे कामकाज स्थगित करावे लागले.विधीमंडळाच्या कंट्रोल रुममध्ये पाणी शिरल्याने वीज पुरवठा बंद करण्यात आला.

मुंबई बुडाल्याचा कंठशोष करणारे कुठे आहेत?

दरम्यान, नागपूरमध्ये भाजपची सत्ता आहे. तर, मुख्यमंत्रीही नागपूरमधूनच येतात. त्यातच एकेकाळी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस हेसुद्धा नागपूरचे महापौर राहिले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेसुद्धा नागपूरचेच. त्यामुळे विरोधकांकडून सरकारला नागपुरच्या पाणीतुंबीवरून जोरदार लक्ष्य केले जात आहे. तर, 'एरवी पावसामुळे मुंबईच्या केवळ सखल भागात वीतभर पाणी साचले तरी ‘मुंबई बुडाली होSS’ असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर आता कुठे आहेत? त्यांना कोणीतरी कंठसुधारक वटी नेऊन द्यायला हवी', असा टोला भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने लगावला आहे.