Maharashtra Weather Forecast: राज्यात मान्सूनचे आगमन लांबलं असलं तरी वळिवाचा पाऊस सध्या अनेक भागात जोरदार होत आहे. आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वळिवाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहील. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पावसासह सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे. एकीकडे राज्यात वळिवाचा पाऊस असतानाच काही भागात तापमानही वाढण्याची शक्यता आहे. उद्या आणि परवा काही भागात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. पुणे आणि परिसरात तापमानात फारसा फरक होणार नाही, तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे या वादळाच्या प्रभावाखाली दक्षिणपूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्रही तयार झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचा जोर आता वाढणार आहे. मात्र, तो कधी पडेल याचा अंदाज नाही. सध्या महाराष्ट्रात सुरु असणारा पाऊस हा मान्सून नाही तर तो वळिवाच्या पाऊस आहे, असे सांगण्यात येत आहे.
मान्सूनचे वेध लागले असताना शेतकऱ्यांनी खरिपासाठी शेतीची मशागत सुरु केलीय. मात्र या काळात बियाणं, खतांचा काळाबाजार करून नफेखोरी करणाऱ्यांना रोखण्यासाठी भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत. बियाणे आणि खतांचा काळाबाजर केल्यास फौजदारी कारवाई केली जाईल. विविध जिल्ह्यात भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत. राज्यात लवकरच खत आणि बियाण्यांच्या विक्रीला सुरुवात होत आहे.
मान्सूनसाठी अजूनही वाट पाहावी लागणार आहे. मान्सूनचे आगमन चांगलेच लांबले आहे. केरळमध्ये अजूनही मान्सून दाखल झालेला नाही. 4 जूनला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज मान्सूनने चुकवला आहे. 10 जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज होता, मात्र आता राज्यात 13 ते 15 जून दरम्य़ान पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे.
National Bulletin No 1: दक्षिण-पुर्व अरबी समुद्रात Depression.
~1120km दक्षिण-द/पश्चिम मुंबई पासून
920km पश्चिम-द/प. गोवा
1160km दक्षिण पोरबंदर & 1520km द. कराचीपुढच्या 24 तासात उत्त्तर दिशेने सरकणार,चक्रिवादळाची शक्यता,पुर्वमध्य अरबी समुद्रात व दक्षिण-पुर्व अरबी समुद्रात
IMD pic.twitter.com/GZC3a2HB3e— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 6, 2023
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्रावाताच्या स्थितीमुळे मान्सूनची प्रगती खुंटलेली आहे. पुढील 4 ते 5 दिवसांनी केरळमध्ये मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण होईल. दक्षिण अरबी समुद्रात चक्रावाताची स्थिती आज अधिक तीव्र होईल, त्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल. नंतर दोन दिवसांत हे कमी दाबाचं क्षेत्र उत्तरेकडे सरकेल आणि त्यानंतरच मान्सूनसाठी योग्य स्थिती निर्माण होईल. अर्थात मान्सूनचं आगमन लांबलं असलं तरी पावसाच्या प्रमाणावर त्याचा परिणाम होणार नाही असं सांगितलं जात आहे.