वाल्मिक जोशी, जळगाव : एका बचत गटाला लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. जळगावमधील पिंप्राळामधील व्यावसायिक योगिता मालवी त्यांच्या गावातल्याच महिलांना एकत्र घेऊन बचतगट चालवतात. तेव्हा योगीता यांना यांच्या बचतगटाला प्रशिक्षण केंद्र कर्ज मिळवून देण्याचं आमिष दाखवत एक व्यक्तीने फसवणूक केली. त्यासाठी त्यांना नीती आयोगाची बनावट कागदपत्रं आणि बनावट नोंदणीपत्र बनवुन देण्यात आलं.
वेगवेगळ्या कारणांनी 15 जानेवारीपर्यंत योगीता यांच्याकडून 94 लाख 14 हजार 853 रुपये या व्यक्तीने उकळले. मात्र प्रशिक्षण केंद्राचे कर्ज आलेच नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर योगीता मालवी यांनी पोलिसांत धाव घेतली.
रामानंद नगर पोलिसांनी आरोपी अविनाश कळमकर याला अहमनदनगरच्या पारनेर तालुक्यातून अटक केली आहे. अविनाश कळमकरने मायभूमी ग्रामविकास संस्था या नावानं एक बोगस संस्था स्थापन केली होती. त्याअंतर्गत पोलिसांनी एकूण 9 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
तुम्ही आपल्या गावात बचतगट चालवत असाल आणि तुम्हाला काम करून देण्याचं आमिष कुणी दाखवतं असेल, तर त्याला बळी पडू नका. विश्वासातली व्यक्ती नसेल आणि कागदपत्रांबद्दल काही शंका आली, तर आर्थिक व्यवहार बिलकूल करू नका. नाहीतर पै-पै वाचवून केलेल्या बचतीवर ठगसेना हात साफ करतील आणि तुमचं नुकसान होईल.