'गुरु भाई'चा नाद करायचा नाय! घोड्याचं दणक्यात बर्थडे सेलिब्रेशन

फटाक्यांची आतषबाजी आणि केक कापून घोड्याचा दणक्यात वाढदिवस साजरा

Updated: Jan 17, 2022, 11:17 PM IST
'गुरु भाई'चा नाद करायचा नाय! घोड्याचं दणक्यात बर्थडे सेलिब्रेशन title=

वाल्मिक जोशी, झी 24 तास, जळगाव : आपल्याकडे मांजर किंवा कुत्र्याबद्दल अपार प्रेम असतं. अगदी त्यांचे वाढदिवसही जोरात साजरे केले जातात. त्यांना कपडेच काय शिवातात किंवा त्यांना अगदी घरच्या सदस्याप्रमाणे ठेवण्याची सोय केली जाते. आता तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण जळगावात चक्क एक घोड्याची चर्चा आहे. 

आपल्या घोड्याबद्दल आगळेवेगळे प्रेम व्यक्त करत धनगर बंधूंनी घोड्याचा मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसात फटाक्यांची आतिषबाजी आणि केक कापून गुरु भाई नावाच्या घोड्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

 सध्या सोशल मीडियामुळे राजकीय पदाधिकारी, नेते, सामाजिक कार्यकर्ते, असो वा मित्रमंडळी यांचा वाढदिवस जोरात साजरा करण्याची जणू स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र एखाद्या प्राण्याचा वाढदिवस साजरा करण्याची पद्धत जळगावात धनगर बंधूंनी सुरू केली आहे. 

गोपाळपुरा परिसरातील जुन्या यशोदा रोड येथील कुशल धनगर व वैभव धनगर ह्या दोन बांधवांनी त्यांच्या लाडक्या घोड्याचा 7 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरा करत एक प्रकारे प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाची शहरतच नाही तर सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे.