Maratha Reservation | 'छातीवर हात ठेवून सांगा...', विनोद पाटलांची रोखठोक भूमिका, भुजबळांवर टीका करत म्हणाले...

Vinod Patil Statement : आरक्षण मागता अन् मागच्या दारानं एन्ट्री करतात (Maratha Reservation), अशी टीका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली होती. त्यावरून आता मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. 

सौरभ तळेकर | Updated: Jan 27, 2024, 06:35 PM IST
Maratha Reservation | 'छातीवर हात ठेवून सांगा...', विनोद पाटलांची रोखठोक भूमिका, भुजबळांवर टीका करत म्हणाले... title=
Vinod Patil criticism Chhagan Bhujbal Over Maratha Reservation

Vinod Patil On Chhagan Bhujbal  : शिंदे सरकाराने मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)  बाबतीत काढण्यात आलेल्या अध्यादेशावरून सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात गदारोळ सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अनेकांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय तर अनेकांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. ओबीसीला धक्का लागणार नाही असं म्हणतात आणि मागच्या दारानं एन्ट्री करतात, अशी टीका मंत्री छगन भुजबळ (Bhujbal on Maratha Reservation) यांनी केली होती. त्यावरून आता मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. छातीवर हात ठेवून सांगा, खरोखरच संपूर्ण मराठा समाज ओबीसीमध्ये आला आहे का? असा सवाल विनोद पाटलांनी केलाय.

काय म्हणाले Vinod Patil ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सगेसोयरे बाबत काढलेल्या जीआरचं मनापासून स्वागत आहे. आमचे सहकारी मनोज जरांगे पाटील यांचे हार्दिक अभिनंदन! समस्त मराठा समाजाच्या एकीमुळे हा ऐतिहासिक निर्णय झाला, असं विनोद पाटील म्हणतात.

एवढ्यात बातमी पाहिली की 'मराठ्यांना ओबीसी मध्ये मागच्या दाराने घुसवलं जात आहे,' असं भुजबळ साहेबांनी वक्तव्य केलं आणि त्यांना आजचा निर्णय मान्य नाही. त्या विरोधात न्यायालयीन लढाई ते लढणार आहेत. माझा भुजबळ साहेबांना सवाल आहे की, खरोखरच संपूर्ण मराठा समाज ओबीसीत आला आहे का? खरंच ५४ लाख कुणबी नोंदी मिळाल्या का? भुजबळ साहेब आपण जबाबदार मंत्री आहात, तुम्हाला देखील खरी हकीकत माहित आहे. तरी देखील विनाकारण तेढ निर्माण करणारे वक्तव्य आपण करत आहात, असं पाटील म्हणतात.

मराठ्यांना ओबीसीत सामील करून घेण्याचा कुठलाही निर्णय झालेलाच नाही. तुमचे सदरील स्टेटमेंट बिनबुडाचे आहे! आपण राज्याचे मंत्री म्हणून जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे. सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो, ज्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत, अशा सर्वांसाठीच शेवटच्या श्वासापर्यंत मी न्यायालयीन लढाई लढणार आहे. क्युरेटीव्ह पिटीशनचा निकाल मराठा समाजाच्या बाजूनेच येईल, हा मला ठाम विश्वास आहे, असंही विनोद पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाही अशा सर्वांसाठी माझी लढाई सुरू राहील. आई जगदंबा माझ्या लढाईला निश्चितपणे यश देईल. येणारी शिवजयंती आपण मराठा आरक्षणाची शिवजयंती म्हणून साजरी करू, असा शब्द मी तमाम समाज बांधवांना देतो, असं विनोद पाटील यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाले होते छगन भुजबळ?

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असे सांगण्यात येत होते मात्र प्रत्यक्षात मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय करण्यात आला आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत ओबीसींसह सर्व समाजांनी आरक्षणाच्या विषयावर हरकती नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केलंय. ओबीसी दलित आणि आदिवासी नेत्यांची बैठक घेण्यात येणार असून आरक्षण वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहन भुजबळांनी यावेळी केलंय.