Raj Thackeray On Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. स्वत: जरांगे यांनी यासंदर्भातील घोषणा करुन आंदोलन मागं घेतल्याचं जाहीर केलं. रात्री निर्णय झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ज्यूस पाजून जरांगेंचं उपोषण सोडलं. मराठ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर राज्यात जल्लोषाचं वातावरण आहे. अशातच आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झालीये. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या प्रकरणावर ट्विट करत प्रतिक्रिया दिलीये.
राज ठाकरे काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन... सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही…
— Raj Thackeray (@RajThackeray) January 27, 2024
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मराठा समाजाच्या पाठिशी सरकार उभं असून, मराठा समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणार असं आश्वासन शिंदेंनी दिलंय. आरक्षण मिळेपर्यंत ओबीसींच्या शैक्षणिक सवलती मराठ्यांना मिळणार आहेत. तसेच सगे सोयऱ्यांबाबत अध्यादेश काढण्यात आलाय. नोंदी मिळणा-यांना प्रमाणपत्र दिले जातील अशी माहिती मुख्यमंत्र्य़ांनी दिली. आरक्षण देणार म्हणून शिंदेंनी शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण केल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
देवेंद्र फडणवीस म्हणतात...
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने या संदर्भात अतिशय सकारत्मकता दाखवली होती. आम्हाला आज आनंद आहे की, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आज प्रश्न सुटलेला आहे. मी सुरुवातीपासून सांगत होतो की, जो काही मार्ग आहे तो कायदेशीर काढावा लागेल, संविधानाच्या आधारावर काढावा लागेल, म्हणून आपल्याला सरसकट करता येणार नाही. पण ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्या रक्त नात्यातील लोकांना आपल्याला ते देता येईल, असं फडणवीसांनी म्हटलंय.