पुणे : जिल्ह्यात चांगला पाऊस कोसळत आहे. या पावसाने खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. या खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने मुठा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, नदीपात्रालगत राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत.
पुराच्या पाण्यामुळे पुण्यातल्या नदीपात्रातले रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शुक्रवारी २ हजार क्युसेक्सने केला जाणारा विसर्ग, शनिवारी दुपारपासून तब्बल १३ हजार ९८१ क्युसेस पर्यंत वाढवण्यात आलाय. त्यामुळे नदीच्या पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
परिणामी नदीपात्रालगत राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. नागरिकांनी नदीपात्राजवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनं लावू नयेत तसेच पाण्याजवळ जाऊनये असा इशारा देण्यात आलाय.
दरम्यान यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच दुथडी भरुन वाहणारी मुठा नदी पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केलेय.