पावसाळ्यात उन्हाचाच कहर! विदर्भ तापलं, तापमान 41 अंशांवर; बळीराजाची प्रतीक्षा संपेना

Monsoon Update: जून महिना संपायला आला तरी महाराष्ट्रात अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. एकीकडे पावसाची प्रतिक्षा आणि दुसरीकडे वाढतं तापमान यामुळे बळीराजा चिंतेत आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 20, 2023, 07:32 PM IST
पावसाळ्यात उन्हाचाच कहर! विदर्भ तापलं, तापमान 41 अंशांवर; बळीराजाची प्रतीक्षा संपेना title=

Monsoon Update: जून महिना संपायला आला तरी महाराष्ट्रात अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. एकीकडे पावसाची प्रतिक्षा आणि दुसरीकडे वाढतं तापमान यामुळे बळीराजा चिंतेत आहे. हवामान विभाग पावसासंबंधी वेगवेगळे अंदाज लावत असताना, पाऊस काही पडण्याची चिन्हं दिसत नाही आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण आणि दोन ते तीन मिनिटांचा पाऊस असाच अनुभव येत आहे. त्यातही विदर्भात तर पाऊस सोडा पण तापमानच वाढत चाललं आहे. 

विदर्भात अजूनही उष्णतेची तीव्रता कमी झालेली नाही. विदर्भात सगळीकडेच तापमानाचा पारा 40 अंशाच्या पार आहे. उष्णता आणि उकाडयामुळे नागपूरकर सध्या प्रचंड त्रस्त झाले आहेत. एकीकडे मान्सूनची प्रतीक्षा लांबत जात असताना जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरी नागपूर, चंद्रपूर ,गोंदिया, वर्धा गडचिरोली येथे तापमान 41 अंश सेल्सिअस पलीकडे आहे.

आज विदर्भातील तापमान

चंद्रपूर - 42.2 सेल्सिअस
नागपूर - 41.4 सेल्सिअस
गोंदीया - 41.4 सेल्सिअस
गडचिरोली - 41.2 सेल्सिअस
वर्धा - 41.0 सेल्सिअस
अमरावती - 40.4 सेल्सिअस
अकोला - 40.2 सेल्सिअस

हवामान विभागाचा अंदाज काय?

राज्यात मान्सून 26 जूननंतर सक्रीय होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसंच  उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांची सुटका या आठवडाखेरीस उत्तर होण्याची शक्यता आहे. 23 आणि 24 जूननंतर अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता आहे. तसा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पावसासाठी आणखी एक आठवडा वाट पाहावी लागणार आहे.

अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळाल्यानंतर या वाऱ्यांची उंचीही वाढत आहे. त्यामुळे मध्य भारतातील अनेक भागात मान्सून बरसेल. हा मान्सून राज्यातही अधिक सक्रीय होईल. आठवड्यानंतर पाऊस अधिक सक्रीय झाल्यानंतर उकाड्यातूनही सगळ्यांची सुटका होण्याची आशा आहे. मुंबईचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. मुंबईत या आठवड्याची सुरुवात प्रचंड उकाड्याने झाली. कुलाबा येथे 33.7 तर सांताक्रूझ येथे 33.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा 2.2 अंशांनी अधिक होते.  

दरम्यान, जून महिनाच्या शेवटच्या आठ ते दहा दिवसांमध्ये आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात जोरदार पाऊस पडेल, अशी माहिती हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. पावसासाठी चांगली स्थिती आहे. पाऊस गायब असल्याने सध्या पावसाची सरासरी ही मोठ्या प्रमाणावर तुटीची आहे.