पुणे : सरकार कोणत्याही रंगाचे असो, त्यापैकी कोणत्याच सरकारला सत्याला सामोरे जायची इच्छा नसते, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी रविवारी पुणे येथे व्यक्त केली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्षे उलटूनही त्यांचे मारेकरी अद्याप मोकाटच आहेत. याच्या निशेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आलेल्या 'जवाब दो' आंदोलनाच्या निमित्ताने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पालेकर बोलत होते. या वेळी बोलताना, 'माजी उपराष्ट्रपतींना 'तुम्ही बेधडकपणे जिथे सुरक्षित वाटेल, तिथे जायला मोकळे आहात,' असे सांगितले जात असेल तर आपण या देशात उद्विग्न होण्यापालीकडे काही करू शकण्याची परिस्थिती नाही', अशी भावना पालेकर यांनी व्यक्त केली.
पूढे बोलताना पालेकर यांनी, 'ज्या देशाचे पंतप्रधान वैज्ञानिकांच्या परिषदेत गणपती हे हेड ट्रान्सप्लांटचे उत्तम उदाहरण असल्याचे म्हणत असतील, अशा देशात वैज्ञानिक दृष्टिकोन कसा प्रसारित होऊ शकेल ? मुसलमान आणि ख्रिश्चन या धर्मांचे लोक मूळ भारतीय नसल्याने त्यांना या देशात अल्पसंख्याकांना दिल्या जाणाऱ्या कुठल्याही सुविधा मागण्याचा हक्क नाही, असे विधान करणारे राष्ट्रपती असतील, तर ते नागरिकांना घटनात्मक संरक्षण कसे देऊ शकतील ?...', असा सवालही उपस्थीत केला.