रेशनच्या धान्यात आढळले दगडाचे खडे आणि उंदराची विष्ठा, वसईतील धक्कादायक प्रकार

 गेल्या काही दिवसांपासून अशाच पद्धतीने धान्य वितरित केल्याचा आरोप स्थानिक गावकरी महिलांनी केला आहे. 

Updated: May 27, 2024, 11:33 AM IST
रेशनच्या धान्यात आढळले दगडाचे खडे आणि उंदराची विष्ठा, वसईतील धक्कादायक प्रकार title=

Vasai Ration Subsidised Food Stone, Rat Faeces Found : एका सरकारी रेशनच्या दुकानातून वितरित करण्यात येणाऱ्या धान्यामध्ये दगडाचे खडे आणि उंदराची विष्ठा आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईतील ससूनवघर गावातील रेशन दुकानावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अशाच पद्धतीने धान्य वितरित केल्याचा आरोप स्थानिक गावकरी महिलांनी केला आहे. 

धान्यात खडे आणि उंदराची विष्ठा आढळली

वसईतील ससूनवघर गावातील जीवन छाया फाऊंडेशन या रेशन दुकानातून धान्य वितरित केले जाते. रेशनच्या दुकानातून रेशन कार्ड धारकांना चांगले आणि सकस धान्य मिळाले, असे सरकारचे धोरण आहे. मात्र वसईतील एका सरकारी दुकानात वितरित करण्यात आलेल्या धान्यात दगडाचे खडे आणि उंदराची विष्ठा आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गावातील महिला धान्य घेण्यासाठी रेशनच्या दुकानावर गेल्या असताना त्यांना धान्यात खडे आणि उंदराची विष्ठा आढळून आली. 

जाणीवपूर्व दुर्लक्षामुळे नागरिकांना विषारी धान्य

गेल्या काही दिवसांपासून अशाच पद्धतीने धान्य वितरित केल्याचा आरोप स्थानिक गावकऱ्यांकडून केला जात आहे. या रेशन दुकानातून वितरित करण्यात येणारे धान्य आम्ही गुरा ढोरांनाही खाऊ घालू शकत नाही, असे ग्रामस्थ महिलांचे म्हणणे आहे. रेशनधारकांना चांगले धान्य मिळावे, असे धोरण सरकारचे असते. मात्र पुरवठा अधिकारी आणि रेशन दुकानदार यांच्या जाणीवपूर्व दुर्लक्षामुळे नागरिकांना विषारी धान्य मिळत आहे, असा आरोप स्थानिक ग्रामस्थ सुशांत पाटील यांनी केला आहे. 

संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

या सर्वप्रकरणात पुरवठा अधिकारी जबाबदार असून रेशनच्या नावाखाली सुरु असलेला काळाबाजार बंद करावा. तसेच महिलांनी दुकान बंद करण्याची मागणीही केली आहे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली आहे. या सर्व धक्कादायक प्रकाराची महिती वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांना देण्यात आली आहे. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.