मुंबई / रत्नागिरी : Untimely rains in Ratnagiri : पावसासंदर्भातली बातमी. राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस झाला. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गारांसह जोरदार पाऊस पडला. लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण आणि गुहागर आदी तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.
विजांचा कडकडाट आणि गारांच्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. चिपळूणसह संगमेश्वर आणि गुहागरमधील वीजपुरवठा खंडीत झाला होता. चिपळूणसह गुहागर आणि संगमेश्वर तालुक्यात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यावेळी गाराही पडल्यात. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडलेत. अचानक वातावरण बदलून गारांचा तडाखा बसू लागल्याने शेतकरी, रहिवासी, पादचारी, दुचाकी चालक यांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.
वादळामुळे वीज प्रवाह खंडित झाला असून काही ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्याचे वृत्त आहे. सुदैवाने या वादळात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाट रुंदीकरणाचे काम 25 एप्रिलपासून 25 मे 2022 पर्यंत घाटात साधारणपणे दुपारच्या वेळात दुपारी 11 ते दुपारी 5 वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाला गती देवून पावसाळयापूर्वी रुंदीकरण पूर्ण करणे तसेच आवश्यक तेथे संरक्षण भिंत उभारणे यासाठी ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. साधारणपणे एक महिना हे काम चालेल.
काम सुरु करण्यापूर्वी घाटासह चिपळूण ते आंबा घाट आणि खेड ते पनवेल याबाबतची माहिती फलक लावून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दिले आहेत.