मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पक्षात इतकी मोठी बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता. शिवसेनेचे 40 आमदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या समोर आता मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे हे बैठकांवर बैठका घेत आहेत. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरे हे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदार आणि नेत्यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाला मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे आता ग्राऊंड लेवलला उतरणार असून ते कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठका आणि मेळावे घेणार आहेत.
शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे आता महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आमदार फुटल्यानंतर आता अनेक खासदार ही शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक नगरसेवक हे आधीच शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात अनेक जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर शिवसेनेतून अनेक पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेनेला मोठं खिंडार पडल्यानंतर आता पुन्हा एकदा पक्षबांधणी करण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यापुढे आहे. एकनाथ शिंदे यांची बंडखोरी मोडण्याचं आव्हान देखील त्यांच्यापुढे आहे.