'हा' शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही - उद्धव ठाकरे

'... हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय', उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

Updated: Jul 1, 2022, 02:51 PM IST
'हा' शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही - उद्धव ठाकरे title=

मुंबई : Uddhav Thackeray Live : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अ‍ॅक्शनमोडमध्ये आले आहेत. उद्धव ठाकरे आज सेना भवनात दाखल झाले. शिवसेनेतून एक मोठा गट फुटल्याने नव्याने पक्षबांधणी करण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी  घेण्यास सुरुवात केली असून पुढची रणनीती ठरवली जाणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. आता मी पुन्हा एकदा शिवसेना भवनात जायला सुरुवात करणार असून शिवसैनिकांना भेटणार आहे. शिवसेनेची नवीन वाटचाल सुरु करणार आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानुसार उद्धव ठाकरे आज सेनाभवनात दाखल झाले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

काय बोलले उद्धव ठाकरे?

आतापर्यंत गेले दोन अडीच वर्ष फेसबूकच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधत होतो. नवनिर्मित सरकाचं अभिनंदन.

तीन प्रश्न माझ्यासमोर आहेत. त्यातला प्रश्न आहे, ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं आणि ज्यांनी हे सरकार स्थापन केलं, त्यांच्या मते त्यांनी तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. हेच मी अडीच वर्षापूर्वी सांगत होतो. जे आमचं आणि अमित शाहा यांचं ठरलं होतं, अडीच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा काळ वामटून घ्यावा, तसं जर का झालं असतं तर आज अडीच वर्ष झालेलीच आहेत. जे काय आज घडलं ते सन्माने झालं असतं.

त्यावेळेला नकार देऊन आता भाजपने हे असं का केलं आह माझ्याबरोबरच महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. शिवसेना अधिकृत तुमच्याबरोबर होती. मला कशाला मुख्यमंत्री बनायला लावलं, तसंच जर घडलं असतं, तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता.

जे आता भाजपबरोबर गेले त्यांनी हा प्रश्न स्वत:च्या मनाला विचारायला हवा, अडीच वर्षापूर्वी ज्यांनी शब्द मोडला आणि अशा पद्धतीने पाठित वार करुन शिवसैनिकांमध्य संभ्रम निर्माण करुन शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा, पण हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनाला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही.