Uddhav Thackeray Phone Call : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेमध्ये संघर्ष पहायला मिळत आहे. कल्याणमध्ये शिवसेना (Shivsena) उप शहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे (Harshvardhan Palande) यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये पालांडे जखमी झाले आहेत. यानंतर कल्याण शहरात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. हा हल्ला शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या सहकाऱ्यांनी केल्याचा आरोप हर्षवर्धन पालांडे यांनी केला आहे. मात्र महेश गायकवाड यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
हर्षवर्धन पालांडे यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कोलशेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत. या हल्ल्यानंतर पालांडे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फोन करत चौकशी केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पालांडे यांच्या तब्येतीची चौकशी करत त्यांना धीर दिला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी वचपा नंतर काढू, तुम्ही काळजी करू नका. पहिले एकदम व्यवस्थित व्हा मी येईन भेटायला असे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन पालांडे यांच्यातील संवाद
हर्षवर्धन पालांडे - जय महाराष्ट्र
उद्धव ठाकरे - जय महाराष्ट्र .. कसं आहे बाबा
हर्षवर्धन पालांडे - माझ्यावर त्यांनी हल्ला केला
उद्धव ठाकरे - हो हो
हर्षवर्धन पालांडे - काम कसे करतो, खूप पुढे पुढे करतो असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे - हो...आता जास्त बोलू नका व्यवस्थित आहात ना ?
हर्षवर्धन पालांडे : व्यवस्थित आहे, वाचलो पळालो, चॉपर तलवार हातात होते त्यांच्या
उद्धव ठाकरे : त्याचा वचपा नंतर घेवू. त्याची काळजी करू नका. पहिले एकदम व्यवस्थित व्हा.
हर्षवर्धन पालांडे : हो साहेब आम्ही घाबरत नाही. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत ,तुमचा आशीर्वाद पाहिजे.
उद्धव ठाकरे : मी पण येईन तिकडे. डॉक्टर आहेत ना, नंतर परत फोन करतो, सगळे सोबत आहेत.
हर्षवर्धन पालांडे यांचे गंभीर आरोप
बुधवारी सकाळच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील संतोषी माता रोड परिसरात हर्षवर्धन पालांडे यांच्यावर तीन ते चार जणांनी तलवार आणि रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात पालांडे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोलशेवाडी पोलिसानी तपास सुरू केला आहे. कामावर जात असताना अचानक तीन ते चार जणांनी माझी गाडी अडवली आणि तलवार रॉडने हल्ला केला असे पालांडे यांनी म्हटले आहे. हल्लेखोर शिवसेनेत जास्त उडतोस असे धमकावत असल्याचा आरोप देखील पालांडे यांनी केला. हे हल्लेखोर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचे साथीदार असून त्यांनी धमकी देत मारहाण केल्याचा आल्याचा आरोप पालांडे यांनी केला आहे.