पावसातील सभेनंतर पवारांना उदयनराजेंचे भरसभेत सवाल

शरद पवारांच्या साताऱ्यातील भर पावसातील सभेत शरद पवारांनी मागच्या निवडणुकीत

Updated: Oct 19, 2019, 04:46 PM IST
पावसातील सभेनंतर पवारांना उदयनराजेंचे भरसभेत सवाल title=

दीपक भातुसे, झी मीडिया, कराड : शरद पवारांच्या साताऱ्यातील भर पावसातील सभेत शरद पवारांनी मागच्या निवडणुकीत उमेदवार निवडताना माझी चूक झाली, मी जाहीर कबूल करतो असं म्हटलं होतं. शरद पवारांकडून झालेल्या अप्रत्यक्ष आरोपाला उदयनराजे भोसले यांनी उत्तर दिलं आहे.

उदयनराजे कराडच्या सभेत म्हणाले, शरद पवार साहेब आपण आदरणीय होता आणि आहात, युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं, चुकीची भाषा बोलताय तर आमचं एकदा ऐका, चुक तुम्ही नाही आम्ही केली राष्ट्रवादीला मतदान केलं,चार निवडून आले ती चूक आमची आहे का? असा सवाल उदयनराजे यांनी केला आहे.

एवढ्यावरच उदयनराजे थांबले नाहीत, तर पुढे बोलताना म्हणाले, भगव्याची आठवण आता आली ही आमची चूक आहे का? सिंचनापासून वंचित ठेवलं ही आमची चुक आहे का? तुमचा पुतण्या - - - - भाषा करतो ही आमची चूक आमची आहे का? राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घातले ही आमची चूक होती का? अशा किती तरी चुकांची कबुली तुम्ही कधी देणार, असा सवाल उदयनराजे यांनी पवारांना केला आहे.

उदयनराजे यांनी चूक या शब्दाला धरून अनेक सवाल पवारांना केले आहेत. महाभारताचा दाखला देत ते म्हणाले, कौरवांची साथ सोडून आम्ही पांडवांच्या साथीला आलो ही आमची चूक आहे का? आम्ही पाठित खंजिर खूपसणाऱ्यांची साथ सोडली ती आमची चूक होती?

आपल्या अनोख्या शैलीत उदयनराजे म्हणाले, 'काँग्रेस, राष्ट्रवादीची घाण धुवून काढण्यासाठी कालचा पाऊस होता, ढगाला लागली कळं काँग्रेस, राष्ट्रवादीची मतं गळं आणि कमळाची फुले फुलं' .