...तर तुळजाभवानी मंदिराची दोन्ही प्रवेशद्वारं पाडणार; धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Tulja Bhavani Temple Entry Gate: तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिराचा इतिहास हा 900 वर्ष जुना असल्याचे सांगितले जाते. यादव कालीन बांधलेल्या भवानी मंदिराचा छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केला. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 29, 2024, 12:18 PM IST
...तर तुळजाभवानी मंदिराची दोन्ही प्रवेशद्वारं पाडणार; धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती title=
जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय (फाइल फोटो)

Tulja Bhavani Temple Entry Gate: धाराशिव जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी मंदिराच्या दोन्ही महाद्वाराचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या ऑडिट अहवाल नकारात्मक आला, तर तुळजाभवानी मंदिराची दोन्ही महाद्वारं पडून 108 फुटी नवे महाद्वार बांधले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच ऑडिटचा सकारात्मक आला तर दोन्ही महाद्वारांमध्ये नवीन महाद्वार तयार केलं जाणार. यासंदर्भातील माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली आहे. 

...तर दोन्ही महाद्वारं पाडणार

तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या राजमाता जिजाऊ आणि राजे शहाजी महाद्वाराचे स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे. सदर महाद्वारांचं बांधकाम अजून किती दिवस टिकू शकते याचा अहवाल आल्यानंतर नवीन महाद्वाराबाबत निर्णय घेतला जाणार आहे. ऑडिट रिपोर्ट नकारात्मक आला, तर दोन्ही महाद्वारं पाडून 108 फुटांचे नवे महाद्वार बांधले जाणार आहे. तर ऑडिट रिपोर्ट सकारात्मक आला तर दोन्ही महाद्वाराच्या मध्ये नवीन महाद्वार बांधले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

सर्वांशी समन्वय

श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरातील नुतनीकरणाच्या विविध विकासात्मक कामास मंदिर संस्थानकडून पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली सुरुवात करण्यात आली आहे. एकूण 58 कोटी 12 लाख रुपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तीन टप्प्यांमध्ये हे काम होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या कामादरम्यान तुळजाभवानी मंदिर परिसरातील काही वास्तू हटवल्या जाणार आहेत. यादरम्यान भाविकांची गैरसोय होणार नाही याचा विचार करून कामाची वर्गवारी करण्यात आली असल्याचं जिल्हाधिकारींनी सांगितलं आहे. कामाबाबत स्थानिक नागरिक, पुजारी, व्यापारी यांच्याशी चर्चा करून त्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी जाणून घेतल्या आहेत.

मंदिराचा इतिहास

तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिराचा इतिहास हा 900 वर्ष जुना असल्याचे सांगितले जाते. यादव कालीन बांधलेल्या भवानी मंदिराचा छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केला. छत्रपती शिवाजी महाराज हे भवानी देवीचे निस्सीम भक्त होते. तुळजाभवानी मातेच्या मंदिराची वास्तू ही चालुक्य काळातील हेमाडपंथी शैलीची आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरातील उत्तम कलाकुसर हे स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण आहे. तुळजापूर भागावर राज्य करणाऱ्या अनेक राजवंशाचे सांस्कृतिक एकत्रीकरण मंदिर पाहताना लक्षात येते. भवानी मंदिराच्या परिसरात उत्कृष्ट कोरीवकाम, शिल्पे आणि सुंदर नक्षीकाम केलेली विविध दगडी खांब आहेत. तुळजाभवानी मंदिराचे भव्य असे दोन प्रवेशद्वार हे भारतीय स्थापत्य शास्त्राची आणि मंदिराची भव्यता सांगतात.