कल्याण : लॉकडाऊन काळात महावितरणकडून नागरिकांना भरमसाठ विज बिलं देण्यात आली. ही विज बिलं कमी करण्यासाठी भाजपकडून राज्यभरात आंदोलनं सुरु आहेत. वारंवार आंदोलनं करुनही सरकार दाद देत नसल्याने राज्यभरात भाजपकडून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, तसंच इमेलद्वारे विज बिलाबाबत निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
शुक्रवारी कल्याण डोंबिवलीत भाजपचे माजी राज्यमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत वीज बिल कमी करण्याची मागणी केली. तसंच महावितरण कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. आंदोलनानंतरही जाग आली नाही तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा या वेळी देण्यात आला आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात नागरिक आर्थिक संकटात सापडले असताना राज्यात अनेकांना मोठ्या रक्कमेची बिलं आल्याने अनेकांना शॉक बसला आहे. महावितरण कंपनीकडून भरमसाठ वीजबिले दिल्याने तीव्र नाराजी आहे. काही जणांना अंदाजे तर काही जणांना चुकीची बिलं पाठवल्याने मोठ्या प्रमाणात लोकांकडून असंतोष व्यक्त होत आहे. सुधारित बिलं पाठवण्याची मागणी होत असून महावितरण कार्यालयाच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्याचं चित्र आहे. भाजपकडून तसंच मनसेकडूनही वीज बिलात सूट देण्याची मागणी सरकारकडे केली जात आहे.
महावितरण आणि खासगी वीज वितरक कंपन्यांकडून विजबिलाच्या माध्यमातून लूट करण्यात आली आहे, असा आरोप करत लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे. वीज बिल कमी करावं, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.