This Bank In Maharashtra Hikes Loan Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पतधोरण आढाव्यानंतर सलग सहाव्या बैठकीमध्ये व्याजदर 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. त्यामुळे व्याजदर वाढणार नाही असं समजून कर्जदार नोकरदारवर्गाने निश्वास सोडला. मात्र आता अचानक एका सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने आपल्या व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. ग्राहाकांसाठी हा मोठा धक्काच मानला जात आहे.
बँक ऑफ महाराष्ट्राने (म्हणजेच महाबँक) कर्जावरील व्यादरामध्ये वाढ करत असल्याच घोषणा शुक्रवारी केली. आरबीआयच्या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली. महाबँकेने निधीवर आधारित कर्ज व्याजदरामध्ये म्हणजेच एमसीएलआरमध्ये 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता या बँकेतून कर्ज घेणाऱ्यांसाठी एमसीएलआर 8.80 टक्क्यांवर गेला आहे. नव्या ग्राहकांना अधिक व्याजदराने कर्ज फेडावं लागणार आहे. तत्काळ प्रभावाने म्हणजेच ज्या दिवशी निर्णय झाला त्या दिवशीपासूनच (9 फेब्रुवारी 2024 पासून) या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचं बँकेने स्पष्ट केलं आहे. बँकेच्या या निर्णयामुळे गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, उद्योग कर्ज आणि वाहन कर्ज व्याजदरदेखील वाढणार आहेत.
आरबीआयच्या पतधोरण आढाव्यानंतर गुरुवारी नवे व्याजदर जाहीर होण्याच्या एक दिवस आधीच एचडीएफसी बँकने देखील व्याजदर वाढवले. एचडीएफसी बँकेने बुधवारी कर्जाचे दर 0.10 टक्क्यांनी वाढवले. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कमेच्या ठेवीसाठी निवडक कालावधीसाठी मुदत ठेव व्याजदरामध्ये 0.25 टक्क्यांनी म्हणजेच 25 आधार बिंदूंनी वाढ केली आहे. पाव टक्के व्याजदर वाढल्याची माहिती बँकेच्या वेबसाईटवरुनही देण्यात आली आहे. ही दरवाढ 9 फेब्रुवारीपासून लागू होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shakrikanta Das) यांनी गुरुवारी आगामी तिमाहीसाठी नवं पतधोरण जाहीर केलं. मागील 5 द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीमध्ये मध्यवर्ती बँकेने 'रेपो दरा'त कोणताही बदल केलेला नव्हता. यंदाही असाच निर्णय घेण्यात आला. गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयमध्ये आरबीआयच्या घोषणेनंतर कोणताही बदल झालेला नाही. सध्याचा रेपो रेट हा 6.50 टक्के इतका आहे. हाच रेपो रेट पुढील पतधोरण आढाव्यापर्यंत कायम राहणार आहे. मात्र आता बँका आपल्या स्तरावर व्याजदर वाढवत अस्याचं पाहायला मिळत आहे. काहींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्याजदर कमी केली जातील अशी शक्यता व्यक्त केलेली. मात्र तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.