प्रणव पोळेकर झी मीडिया रत्नागिरी : ही बातमी आहे पवार आजोबांची... राज्याच्या राजकारणातले भीष्म पितामह असलेले शरद पवार आपल्या नातवांना आता राजकारण आणि समाजकारणाचे धडे देत आहेत... तेही प्रात्यक्षिकासहीत... आपल्या तीन नातवांसह पवारांनी नुकताच कोकणचा दौरा केला. या दौऱ्यात आजोबांसोबत सावलीसारखे वावरणारे नातू काय शिकले... पाहा...
आपण या तिघांना ओळखलंत का? गेल्या काही दिवसांपासून हे तिघेजण दिवसाचे २४ तास शरद पवारांसोबत फिरतायत... सध्या कोकण दौऱ्यावर आलेल्या शरद पवारांची पाठ त्या तिघांनी अजिबात सोडलेली नाही... त्यामुळंच हे तिघे नेमके कोण, अशी कुजबूज रंगली होती. त्याचा उलगडा आता झालाय. ही आहेत पवार कुटुंबातली धाकटी पाती... राजकारणातली पवारांची तिसरी पिढी...
पार्थ अजित पवार... रोहित राजेंद्र पवार... आणि युगेंद्र श्रीनिवास पवार... पवार आजोबांची नातवंडं... पार्थ हा अजित पवारांचा मुलगा... रोहित हा पवारांचे थोरले बंधू आप्पासाहेब पवार यांचा नातू... तर युगेंद्र हा अजित पवारांच्या धाकट्या बंधूचा मुलगा... खरं तर सध्याचा कौकण दौरा हा पवारांचा राजकीय दौरा नाही. सत्तेत असताना घेतलेल्या निर्णयांचं काय झालं, हे पाहण्यासाठी पवार कोकणात आलेत... पण तरीही ते तिघेजण कायम पवारांसोबत दिसतायत... जणू आपल्या आजोबांकडून महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल समजून घेत आहेत...
शरद पवार नावाच्या विद्यापीठाचे हे विद्यार्थी... आजोबांच्या केवळ सहवासातून ते आपसूकच राजकारणाचे आणि समाजकारणाचे धडे गिरवतायत... आपल्या आजोबांनी केलेल्या कामाचं कौतुक या नातवंडाच्या चेहऱ्यावरही झळकतंय...
महाराष्ट्राचं राजकारण ज्या व्यक्ती भोवती फिरतं, त्या शरद पवारांची तिसरी पिढी पहिल्यांदाच त्यांच्यासोबत जाहीरपणं फिरत असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीच्या घड्याळातले हे नवे काटे... अलार्म सेट केलाय... आता पवारांची ही नातवंडं सक्रीय राजकारणात कधी गजर करतायत, त्या वेळेकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय...