मंदिरात येऊन देवाच्या पाया पडला, दानपेटी घेऊन फरार झाला, Video व्हायरल

बारामती तालुक्यातील एका मंदिरातील प्रकार सीसीटिव्हीत कैद 

Updated: Feb 21, 2022, 06:59 PM IST
मंदिरात येऊन देवाच्या पाया पडला, दानपेटी घेऊन फरार झाला, Video व्हायरल title=

बारामती : बारामती तालुक्यातील होळ गावातील ढगाईदेवी मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला. चोरीचा हा प्रकार मंदिरातल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

मंदिरात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्याने आधी हात जोडून देवीचं दर्शन घेतलं आणि चोरट्यानी मंदिरातील दानपेटी लंपास केली. विशेष म्हणजे चोरट्याने दान पेटी मंदिराबाहेर नेल्यानंतर पुन्हा मंदिरात प्रवेश केला आणि हात जोडले. 

मध्यरात्रीच्या सुमारास मंदिराच्या दरवाजाचं कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. चोरी करण्याआधी देवीचे दर्शन केले आणि दुसऱ्या चोरट्याच्या साह्याने मंदिरातील दान पेटी बाहेर नेली. बाहेर गेल्यानंतर पुन्हा गाभाऱ्यात येऊन देवीचे दर्शन घेतले आणि पोबारा केला. 

दानपेटीत किती रुपये होते हे अद्याप समजू शकले नाही. परंतु चोरी करायच्या आधी आणि चोरी केल्यानंतर चोरट्याने देवीचे दर्शन घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.