महाराष्ट्राला काळीमा ! पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज संपुष्टात

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातल्या पीडितेचा अखेर अंत झाला. 

Updated: Feb 10, 2020, 09:10 AM IST
महाराष्ट्राला काळीमा ! पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज संपुष्टात title=

अमर काणे, झी मीडिया, वर्धा : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातल्या पीडितेचा अखेर अंत झाला. सात दिवसांपासून पीडितेची सुरु असलेल्या मृत्यूशी झुंज संपुष्टात आली आहे. सकाळी ६.५५ मिनिटांनी तिचा मृत्यू झाला. ३ फेब्रुवारी सोमवारची 'ती' सकाळ. ही शिक्षिका कामवर जात असताना आरोपी विकेश नगराळेने भर रस्त्यात पेट्रोल टाकून तिला जाळलं. पण पीडित शिक्षिकेची सात दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपुष्टात आली आहे.

प्रेमभंगातून आरोपी विकेश नगराळेने पीडित शिक्षिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात पीडिता जवळपास ४० टक्के भाजली होती. मात्र अन्ननलिका, श्वसननलिकाच जळल्यामुळे तिचा जगण्याचा संघर्ष सुरु होता. डॉक्टरांनीही तिला जगवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र तरीही सगळ्यांच्याच प्रयत्नांना अपयश आलं.

आपल्या पोटच्या मुलीवर त्या नराधमाच्या कृत्याने ही वेळ आल्याने आधीच बिथरून गेलेल्या आईवडिलांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली आहे.

जळीतकांडाची घटना घडल्यानंतर राज्यभरातून निषेध व्यक्त झाला. मोर्चा निघाले. आरोप झाले. मात्र यातून त्या मुलीचे प्राण कोणीच वाचवू शकलं नाही. मुळात अशा घटना घडणार नाहीत. किंवा अशा घटना घडवण्याचं धाडसंच कोणी करणार नाही असा वचक, असे कायदे झाले तर पुन्हा अशी वेळ कोणत्याही पीडितेवर येणार नाही. कारण राज्य...शहरं...मुली बदलतात...घटना त्याच त्याच पुन्हा घडतात. ज्या दिवशी ही विकृती थांबेल. त्याच दिवशी या पीडितांना, निर्भयांना खरा न्याय मिळेल.