स्कूटीवरुन उडाली आणि बसच्या चाकाखाली आली; आईच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा मृत्यू

कोल्हापुरात भीषण अपघात झाला आहे. बसला ओव्हरटेक करताना चिमुरडी खाली पडून तिटा मृत्यू झाला आहे. 

Updated: Jul 19, 2023, 11:48 PM IST
स्कूटीवरुन उडाली आणि बसच्या चाकाखाली आली; आईच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा मृत्यू  title=

Kolhapur Accident News : कोल्हापुरात एक विचित्र अपघात झाला आहे. आईच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. आई मुलीला स्कुटीवरुन शाळेत सोडत असताना हा अपघात झाला. अपघात इतका भयानक होता की चिमुरडी स्कूटीवरुन उडून बसच्या चाकाखाली आली. या अपघातानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.  

कोल्हापूर  शहरातील सानेगुरुजी वसाहती मध्ये रहात असणाऱ्या चार वर्षीय मुलीचा बसच्या चाखाखाली सापडून मृत्यु झाला आहे. मुलीची आई दुचाकीवरून जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला आहे. मुलीची आई मुलीला बालवाडीला सोडायला निघाल्या होत्या. त्यावेळी स्पीड ब्रेकर वर दुचाकी आल्यानंतर मुलगी उडून खाली पडली. त्यावेळी शेजारून चाललेल्या बस खाली मुलगी सापडून हा अपघात झाला. यामध्ये चार वर्षीय संस्कृती रत्नदीप खरात हिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सानेगुरूजी वसाहत मधील केएमटीच्या बसस्टॉपजवळ ही घटना घडली आहे. मुलीचे वडील रत्नदीप खरात यांची सासुरवाडी जिवबानाना पार्क येथे आहे. त्यांची पत्नी स्नेहा आज सकाळी जिवबानाना पार्क येथील घरातून मुलीला बालवाडीत सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या. यावेळी बसला ओव्हरटेक करताना त्यांचा स्पीड ब्रेकरवरील ताबा सुटला. त्यावेळी मुलगी दुचाकीवरून डाव्या बाजूला खाली पडली. याचवेळी पाठीमागून आलेल्या बसच्या चाकाखाली चार वर्षीय संस्कृती सापडली आणि जागेवरच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. चार वर्षीय संस्कृतीच्या अचानक जाण्याने अख्ख कुटुंब दुःखात कोसळला आहे.

पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात

पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. आळेफाटा जवळील संतवाडी येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर, एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघाताचा हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून भरधाव वेगाने जाणाऱ्या डॉक्टरचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारची दुचाकी ला जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी वरील चालक आणि पाठीमागे बसलेली व्यक्ती जोरात बाजूला फेकली गेली.