Measles in Maharashtra : मुंबई नागपूरपाठोपाठ आता अकोल्यातही गोवरचा शिरकाव झालाय. (Health News) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात गोवरसदृश्य तापाच्या 29 रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांमध्ये गोवरची लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने मुंबईत तपासणीसाठी पाठवले आहेत. (Measles in Akola)
दहा रुग्ण ग्रामीण भागातले तर 19 रुग्ण महापालिका क्षेत्रातले आहेत. कुठल्याही प्रकारचा ताप हा गोवर असू शकतो त्यामुळे पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे असं आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. गोवरच्या तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात विशेष नमुने तपासणी केंद्र उभारणार आले आहे.
गोवरमधून बरे झाल्यानंतरही एक महिन्यापर्यंत धोका कायम आहे, अशा इशारा मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलाय. गोवरची लागण झालेलं बाळ बरं झालं तरी पुढील साधारण एक महिना त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. गोवरमधून बरं झालेल्या बाळांना पुन्हा उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात येत असल्याचं दिसून आले आहे. त्यामुळे गोवरमधून बरे झालेल्या रूग्णांची काळजी घेण्याचं मोठं आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे.
गोवर झाल्यावर बाळाची प्रतिकारशक्ती कमी होते. औषधोपचाराने बाळ बरं झालं तरी त्याची प्रतिकारशक्ती लगेच पूर्ववत होत नाही. त्यासाठी साधारणपणे महिन्य़ाचा कालावधी लागतो. त्यामुळे गोवरमधून बरे झालेल्या रुग्णांना सर्दी, ताप, खोकला व अन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते. बाळ बरं झाल्यावर त्याच्या पोषणाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई शहरातील गोवरच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. बाधित आढळणाऱ्या धोकादायक ठिकाणांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. सुरुवातीला मुंबईच्या आठ प्रभागांमध्ये गोवरचा उद्रेक झाला होता, मात्र आता ही संख्या 11 वर पोहोचली आहे. तसेच शुक्रवारी नवे आठ रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या 260वर गेली आहे.
(Measles in Mumbai) मुंबईत गोवंडी, चेंबूर, कुर्ला, मालाड, माटुंगा, भायखळा, दादर आणि सांताक्रूझ या आठ भागांबरोबरच आता भांडूप, प्रभादेवी आणि अंधेरी पूर्व या तीन प्रभागांमध्ये रुग्णसंखेत वाढ झाली आहे. प्रभादेवी आणि अंधेरी पूर्व या दोन भागांमध्ये तीन वेळा, तर भांडूपमध्ये दोन वेळा गोवरचा उद्रेक झालाय.