सुप्रिया सुळेंना शुभेच्छांसाठी अजित पवारांचा फोन? दादांना काय दिला सल्ला? सांगितलं काय घडलं..

Supriya Sule on Ajit Pawar:  विजयानंतर अजित पवार यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या का? तुम्ही त्यांना काही सल्ला दिला का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 6, 2024, 06:28 PM IST
सुप्रिया सुळेंना शुभेच्छांसाठी अजित पवारांचा फोन? दादांना काय दिला सल्ला? सांगितलं काय घडलं.. title=
Supriya Sule on Ajit Pawar Call

Supriya Sule on Ajit Pawar: बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. अस्तित्वाच्या लढाईत सुप्रिया सुळे यांनी सलग चौथ्यांदा विजय प्राप्त केला.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुप्रिया सुळे या आज बारामती मतदारसंघात दाखल झाल्या आहेत. दौंड तालुक्यातील यवत येथे कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सुप्रिया सुळे यांनी भेटीगाठी घेऊन आभार मानले आहेत. दरम्यान या विजयानंतर अजित पवार यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या का? तुम्ही त्यांना काही सल्ला दिला का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. 

गुलाल उधळून आणि डीजे लावून स्वागत 

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवल्यानंतर विविध कामगार संघटनांच्या माध्यमातून बारामतीतील एमआयडीसीत हत्तीवरून लाडूचे वाटप केले जात आहे. विविध कामगार संघटनांच्या माध्यमातून हा आनंद साजरा केला जातोय. यवतमधील कालभैरवनाथ मंदिरात कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सुप्रिया सुळे यांचे जंगी स्वागत केलेय. सुप्रिया सुळे यांचे गुलाल उधळून आणि डीजे लावून कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. 

अजित दादांचा फोन आला होता का? 

मला माझा सोशल मीडिया बघायला वेळ नाही मिळाला. परवा रात्री उशीर झाला. काल दिवसभर इंडिया आघाडीची मिटींग होती. त्यानंतर पार्लामेंटचे पेपरवर्क करत होते, असे सुप्रिया सुळेंनी सांगितले. अजित दादांचा फोन आला होता का? असा प्रश्न विचारल्यावर माझा फोनदेखील माझ्याकडे नाही, असे त्या म्हणाल्या. 

अजित दादांना काय सल्ला द्याल?

अजित दादांना काय सल्ला द्याल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर प्रश्न विचारणाऱ्यांना त्यांनी थांबवले. आणि हात जोडून म्हटले, मी एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे. आपल्यापेक्षा वयाने, नात्याने, कर्तुत्वाने जे मोठे असतात, त्यांना सल्ला द्यायचा नसतो. आपण त्यांच्याकडून सल्ला घ्यायचा असतो, असे म्हणते सुप्रिया सुळे यांनी हा विषय संपवला. 

'पवार साहेब काळजाचा विषय'

बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी विजयाचा चौकार मारल्यानंतर पुण्याच्या इंदापुरमध्ये 'पवार साहेब काळजाचा विषय हाय' अशा आशयाचा एक बॅनर लागलाय. हा बॅनर येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. त्यामुळे सध्या इंदापूर शहरात या बॅनरची जोरदार चर्चा रंगलीय. अँडवोकेट आशुतोष भोसले मित्र परिवाराकडून हा बॅनर शहरात न्यायालयाच्या कॉर्नरवर लावण्यात आलाय.