माथेफिरू एसटी चालक संतोष मानेला सर्वोच्च न्यायालयाकडून जन्मठेप

२५ जानेवारी २०१२ रोजी एसटी बसचालक संतोष माने याने बस भरधाव चालवून रस्त्यावरील नऊ लोकांचा बळी घेतला होता.

Updated: Jan 9, 2019, 05:39 PM IST
माथेफिरू एसटी चालक संतोष मानेला सर्वोच्च न्यायालयाकडून जन्मठेप title=

नवी दिल्ली: पुण्यात बेदरकारपणे एसटी चालवून ९ जणांचा बळी घेणारा माथेफिरू एसटी चालक संतोष माने याला फाशी देण्याचा निर्णय बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला. त्याऐवजी न्यायालयाने संतोष मानेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ८ एप्रिल २०१३ रोजी पुणे सत्र न्यायालयाने संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात माने उच्च न्यायालयात गेला होता. शिक्षा सुनावताना आरोपीची बाजू नीट ऐकून न घेतल्याचे सांगत उच्च न्यायालयाने संतोष मानेची फाशी रद्द केली होती. तसेच फेरचौकशीसाठी खटला पुन्हा पुणे सत्र न्यायालयाकडे वर्ग केला होता. त्यात कुठलाही नवा मुद्दा त्याला मांडता आला नाही, आपल्या कृतीचे समर्थन करता आले नाही. त्यामुळे सत्र न्यायालयाने मानेची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. या निकालाविरुद्ध संतोष मानेने केलेले अपील उच्च न्यायालयातील न्या. व्ही. के. कानडे व न्या. डी. बी. कोदे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावले होते. त्यामुळे संतोष माने याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

पुण्यात २५ जानेवारी २०१२ रोजी एसटी बसचालक संतोष माने याने बस भरधाव चालवून रस्त्यावरील नऊ लोकांचा बळी घेतला होता.  यामध्ये ३८ जण जखमीही झाले होते. संतोष माने हा मुळचा उत्तर सोलापूर तालुक्यातील कवथळे गावचा आहे. ड्रायव्हर म्हणून १३ वर्षांची सेवा झालेला संतोष स्वारगेट डेपोत नियुक्तीवर होता. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, चोरी आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, हे आरोप लावण्यात आले होते.